Satish Khade

स्थानिक हवामान केंद्र

स्थानिक हवामान केंद्र   भाग २

 

 हवामान केंद्रात वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग मोजणारे संयंत्र,, पर्जन्यमापी, याबरोबरच सोट मुळ व तंतूमुळा भोवतीची ओल, आर्द्रता, हवेतली आद्रता, हवेचा दाब, झाडाच्या पानांवरील ओलावा,  हवेचे तापमान, जमिनीचे तापमान, प्रकाशाची तीव्रता, हे सगळं मोजणारी संयंत्रे, सोलर प्लेट,इ. यातील काही संयंत्राबाबत  मागच्या लेखात आपण पाहिले, आता उरलेले या लेखात पाहू.

 आर्द्रता जमिनीची : झाडांच्या मुळाभोवती वाफ़सा अवस्था( ५०% माती व खत ,२५% पाणी, २५%हवा) जास्तीत जास्त काळ राहण्यासाठी मदत आर्द्रता मोजल्याने होते. त्यावर आधारित सिंचनाचे नियोजन करता येते. काटेकोर सिंचन साधता येते.

 काटेकोर सिंचन ( precision irrigation) करण्याने पाट पध्दतीच्या तुलनेत७५ते ८०% पाण्याची बचत होते, तितकीच खताचीही होते. त्याच बरोबर उत्पादनात ३०-४०% वाढ होते. ह्या काटेकोर सिंचनासाठी फुले इरीगेशन ॲप मोबाइल फोन वर उपलब्ध आहे. स्थानिक हवामान केंद्राचा डाटा त्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. सोट मूळ व तंतूमूळ या दोन्ही भोवती सेन्सर्स दिलेले असतात.

 

हवेची आर्द्रता : हा ही अधिक महत्त्वाचा घटक. हवेचा दाब, तापमान आणि हवेची आर्द्रता यावर पीकावरील बुरशीजन्य रोग वा कीड अवलंबून असतात. हे केवळ द्राक्ष व डाळिंबाचंच नाही तर बहुतेक सर्व पिकांवर किडीचा संबंध हवेतील आद्रतेच्या प्रमाणा शी संबंधित असतो.

पानांवरील आर्द्रता: याचा तर रोगराईशी अगदी निकटचे संबंध असतो. किती वेळ पानांवरची आर्द्रता टिकली आहे त्यावर आधारित रोगांचे प्रकार व तीव्रता ठरते. या सर्व प्रकारच्या आर्द्रतेच्या नोंदीमुळे रोगाच्या आधीच फवारणी व तशा प्रकारच्या उपाययोजना करण्यास वाव व वेळ मिळतो. त्यामुळे  औषधांची गरज  आहे की नाही हेही समजते. पिकाचे नुकसान व फवारणीचा गरजेपेक्षा अधिक खर्च या दोन्ही वाचतात.

 लक्स मीटर/सौर्य विकिरण:  सूर्यप्रकाशाची तीव्रता व तो उपलब्ध असल्याचा वेळ याचा संबंध फुलोरा व फलधारणा यांच्याशी अगदी जवळचा असतो. त्यामुळे त्याची निरीक्षण व आकडेवारी महत्त्वाची भूमिका बजावतात.

        हवामान केंद्र केवळ उभारून भागत नाही तर त्याची साधी पण महत्त्वाची देखभाल साठी कायम जबाबदार माणसाची नेमणूक लागते. ते संरक्षित जागेत बसवणे आवश्यक असते. देखभाल म्हणजे काय ,तर त्यावर बसलेली धूळ पुसून/ धुवून काढणे, पक्षांची विष्ठा पडली असेल तर ती स्वच्छ करणे, या आणि अशा साध्या गोष्टी. दहा-पंधरा मिनिटांचेच काम असते पण ती नियमित व्हावे लागते हे महत्त्वाचे. तसेच ही सर्व नोंदली जाणारी  माहिती संगणकावर गोळा करुन, साठवून त्यावर आधारित सल्ला देण्यासाठी योग्य सल्लागाराची ही गरज असते. मग हा सल्लागार गावापासून किती दूर असला तरी संगणक व इंटरनेटमुळे डाटा सल्लागारापर्यंत पोहोचू शकतो.  आता बहुतेक गावांमध्ये तरुण व शिक्षित सरपंच आहेत. आदर्श गावं ही संख्येने बरीच झाली आहेत. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत भाग घेवून पाण्यासाठी भरीव कामं करुन प्रगतीची कास धरणारी ही गावे बरीच आहेत. तसेच खूप प्रगतीशील शेतकरी,  गट शेती यशस्वी पणे करणारे लोक आहेत, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्या आहेत. यां सर्वांनी तर स्थानिक हवामान केंद्राचे पाऊल लगेचच टाकायला हवे. या केंद्रामुळे सगळ्या गावची एक फवारणी वाचली किंवा वेळेवर एखादी फवारणी होऊन पिक वाचले तरी एका हंगामातच या हवामान केंद्राचे पैसे वसूल होतील हे नक्की !           

               हवामान केंद्र व्यतिरिक्तही काही ठिकाणी सॅटॅलाइट डाटांवर आधारित, तसेच ड्रोन सर्वे पद्धतीने ही हवामानाच्या नोंदी उपलब्ध केल्या जावू शकतात. बरेच शेतकरी याचा आधार घेत आहेत. तसेच काही मोबाईल ॲपवरही पैसे देऊन हवामान विषयक डाटा  उपलब्ध आहे. तिथूनही हवामानावर लक्ष ठेवता येत आहे. यातून पिकांचे संरक्षण संवर्धन व गुणवत्ता मिळवण्यात  अनेक शेतकरी यशस्वीता मिळवत आहेत.

 

  हवामान केंद्र व पिक सल्ला:  हवामान केंद्र बनवणार्‍या काही कंपन्या  आहेत की तुम्ही त्यांचे हवामान केंद्र बसवले तर त्यातून मिळणाऱ्या हवामानाच्या नोंदी त्यांच्या ऑफिसच्या संगणकावर नोंदवून घेतात. त्यावर आधारित शेतकऱ्यांना सल्लाही देतात. महाराष्ट्रभर हळूहळू त्यांना प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या गटाने तर काही गावात ग्रामपंचायतीने अशी केंद्रे उभारून प्रगतीच्या महामार्गावर वाटचाल सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यातही नगर व नाशिक जिल्ह्यात शेतकरी जास्त प्रमाणात याचा लाभ घेत आहेत. नगर जिल्ह्यातील एकट्या राहता तालुक्यात ५० पेक्षा अधिक हवामान केंद्र कार्यरत आहेत अशी माहिती मिळते. काही ग्रामपंचायत व शेतकरी भागीदारीत सुद्धा ही हवामान केंद्र उभारता येतात.

   नारायणगाव (पुणे) येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यांच्याकडे उभारलेल्या हवामान केंद्राच्या साह्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना पीक विषयक सल्ला देऊन त्यांचे लक्षावधी रुपयांचे नुकसान वाचवले आहे. तर कधी पिकाविषयी योग्य सल्ला देऊन भरपूर फायदाही करून दिला आहे. जास्त पाऊस, जास्त तापमान, जास्त वारा, जास्त थंडी, जास्त वादळ या आणि अशावेळी पिकांवर झाडांवर तणाव येतो. ते त्यामुळे विविध रोगांना व समस्यांचे बळी ठरतात. अशावेळी विविध उपाय योजना करणे बुरशीनाशकाची वा मायक्रोन्यूट्रियंट्स व इतर अन्य काही फवारणीची गरज आहे का? असल्यास कोणत्या व किती प्रमाणात कधी मारायचे ? अशा प्रकारचा सल्ला मोबाईल मेसेज द्वारे इथून दिले जातात. अशा सारखे हवामान आणि पिके यांच्या संबंधित बरीचशी सूचना आणि माहिती पुरवली जाते. कधी कधी भीतीपोटी गरज नसलेली औषधे व फवारेही मारले जाऊ शकतात. या केंद्राकडे असलेल्या निश्चित माहितीमुळे ते टळू शकतात, तो मोठा खर्च वाचतो. काही हवामान केंद्र पुरवणारी कंपनी उत्तम प्रतीच्या वा अधिकाधिक उत्पन्नासाठी सल्ला तर देतेच पण शेतकऱ्यांचा मालाच्या विक्री व मार्केटिंगची ही व्यवस्था करते. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व सप्लाय चेन आहे त्यांची व्यापक प्रमाणात ,विशेषतः मॉल्स कंपन्यांबरोबरच्या व्यवसायात हवामान केंद्रे यांचा डाटा व त्यावर आधारित शेतमालाच्या विक्रीसाठी याचा मोठा उपयोग करून घेत आहेत.

 

 नाशिकच्या ‘सह्याद्री फार्म्स’ ने स्वतःच हवामान केंद्र बनवलं आहे.तिथे जगभरातील वेधशाळांमधल्या हवामान अंदाजाचं निरीक्षण केलं जातं.संभाव्य नुकसान टाळण्यासाठी या व्यवस्थेचा उपयोग होतो. एकदा असच एक संकट आलं, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता.त्यामुळे नाशिक परीसरात मोठं वादळ येवू घातलं होतं.पण हातात चार दिवस असताना ही सुचना मिळाल्या मुळं सर्व शेतकरी वेगानं कामाला लागले.त्यांनी द्राक्षांचे सर्व घड उतरवले, सुरक्षीत जागी ठेवले. चौथ्या दिवशी प्रचंड गारपीट झाली पण द्राक्षाचा एक मनी सुध्दा वाया गेला नाही.

 

    पिक विमा व हवामान केंद्र:

 पिक विमा साधारणपणे दोन प्रकारात उपलब्ध आहे १)उत्पादनातील तफावत आणि २) पॅरामीट्रिक कव्हर म्हणजे आपत्तीतील नुकसान. आपत्तीतील पीक नुकसानीत स्थानिक हवामान केंद्र खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी पिकाला नुकसान करणारा पाऊस म्हणजे किती पाऊस ? नुकसान करणारे तपमान म्हणजे किती तापमान (ऊन आणि थंडी दोन्हीही)  ? वादळा वेळी वाऱ्याचा वेग किती असला म्हणजे नुकसान होते ? आर्द्रतेच्या बाबतीतही तेच सहाय्य करणारी ही आकडेवारी तज्ञांनी अनुभव व अभ्यासांती निश्चित केली असते. अशावेळी आपत्ती मुळे नुकसान झाले आहे हे मान्य करण्यासाठी मान्यताप्राप्त स्थानिक हवामान केंद्रावरची ही रीडिंग ग्राह्य धरले जातात. परंतु अशी केंद्र नसतील तर तालुक्यातील व मंडलातील (तीन चार गांव मिळून एक मंडळ) हवामान खात्याची आकडेवारी ग्राह्य धरतात. दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीत तफावत असण्याची शक्यता  बरीच असते. त्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई  बाबत बऱ्याच वेळा शंका निर्माण होतात किंवा खूप अडचणी येतात. उदाहरण दिले की आपल्याला समजेल , केळीच्या बागेचा high wind चा विमा काढून ठेवला आहे. एप्रिल मे च्या वादळात केळी बागीचे फूलोरा अवस्थेत असलेल्या केळीबागेचे   मोठे नुकसान झाले तर विमा कंपन्या अशा वेळी त्या परिसरातील वाऱ्याचा वेग तपासतात. तो वेग ताशी 45 किलोमीटर पेक्षा अधिक असेल तर त्या परिसरातील सर्व विमाधारक केळी बागयतदारांना  विनासयास  नुकसान भरपाई मिळते. अशावेळी त्या गावात हवामान केंद्र असेल तर हे रीडिंग ग्राह्य धरले जाते.  हे असे स्थानिक  केंद्र नसेल तेव्हा शासकीय हवामान खात्याने नोंदवलेली आकडेवारीचा संदर्भ घेतला जातो. पण कदाचित जिथे शासकीय हवामान खात्याचे केंद्र आहे तेथील वाऱ्याच्या वेगाची रिडींग व या गावच्या रीडिंग याच्यात फरक असू शकतो. हा फरक आला तर नुकसान भरपाई मिळत नाही. तर हे महत्त्व आहे हवामान केंद्राचे विम्याशी. हाच मुद्दा अतिवृष्टी, अवर्षण, थंडी, उन, आद्रता यातून होणाऱ्या नुकसानाबाबतही लागू होतो.

       थोडक्यात या पावसाळ्यापूर्वीच गावात व्यक्तिगत, गटाने, गावाने  हवामान केंद्र बसवले तर खूप उपयुक्तता वाढवून नुकसान टळेल, फायदा वाढेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top