Satish Khade

पाऊस, पाणी आणि हवामान

आला पावसाळा……. रोहिणी, मृग,हस्त, वैशाख वनवा, आषाढ धार, हे आणि असे शब्द आणि त्यांचे संदर्भ हे इतिहास जमा झालेत. आता आपला  शेतकरी  पाऊस, हवामान अंदाज, किती इंच  पाऊस अशी भाषा बोलू व वापरु  लागलाय. काही ठिकाणी खाजगी हवामान केंद्र तर काही ठिकाणी हवामानाचे ॲप ही तो वापरू लागलाय. नक्षत्राची भाषा ही बरोबर होती आणि आजची ही !!  फरक एक झालाय की हवामानाचे आणि पावसाचे अंदाजाचा प्रवास ढोबळते कडून वस्तुनिष्ठतेकडे  सुरू आहे, हेही खरेच. हवामानाचा वेध घेणे खूप पूर्वीपासून माणसाला हवे होते.

           कोट्यवधी भारतीयांचं जगणं तसच  देशाची अर्थव्यवस्था यांचा मान्सून म्हणजेच मोसमी पावसाशी घनिष्ठ व मुलभूत संबंध आहे.

  मान्सून हा शब्द मौसम या अरेबिक भाषेचा अपभ्रंश आहे मौसम म्हणजे ‘सिझन’ ‘ऋतू’.

 

हवामानशाळांची वाटचाल

    मोसमी पावसाचा अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला. त्यावेळचे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष (न् धूमकेतूचा शोध लावणारे )एडमंड हॅले यांनी मोसमी पावसाचा नकाशा सर्वप्रथम प्रसिद्ध केला. त्याकाळच्या पार्श्वभूमीवर जेव्हा संसाधनं अजिबात नव्हती किंवा तुटपुंजी होती त्या पार्श्वभूमीवर हे काम अद्वितीय व अद्भुत असेच होते.

* पृथ्वी भोवतीच्या वातावरणातील ‘क्लायमेट’ ही सर्वात महान व सर्वाधीक गुंतागुंतीची प्रणाली आहे. गेली साडेतीनशे वर्ष संशोधन होऊनही  क्लायमेट च्या सर्व रहस्यांचा अजून उलगडा झालेला नाही. मौसमी पावसा बद्दल दरवर्षी नवीन माहिती पुढे येतच आहे .

 

इ.स. १८४० मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली वेधशाळा त्रिवेंद्रमला उभी केली. महाराजांना विज्ञान तंत्रज्ञानाचे खूप आकर्षण होते, विशेषतः पश्चिमी  देशातील विज्ञानाचे चाहते होते. त्यातूनच त्यांनी या वेधशाळेची  उभारणी केली. योगायोगाने ही वेधशाळा पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्ता वरच आहे.

 

* याच वेध शाळेतून इ.स.१८५२ते १८६९ दरम्यानच्या निरीक्षणातून नोंद करण्यात आली की मृग नक्षत्रावर सात जूनला भारतात पाऊस येतो.

 

* इस्ट इंडिया कंपनीने इ.स.१८७५ मध्ये भारतीय हवामान खाते स्थापन करून एच. एफ. ब्लॅंक फोर्ड यांची हवामान खात्याचे भारताचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती केली. काही दशकापर्यंत ठिकठिकाणी केलेल्या तपमान ,पाउस व हवामान संबंधी इतर नोंदी घेतल्या जावून त्या हवामान शाळांना पाठवल्या जात. त्यांचा दस्तऐवज तयार होत. पण १९८० पासून उपग्रह, रडार, इंटरनेट, संगणक आणि यातून मिळालेल्या माहिती यांचा वापर करून हवामान संशोधनात  अत्याधुनिकता खूपच वाढली. अनेक देशाप्रमाणेच भारतातही सुपर कॉम्प्युटरचा सुद्धा वापर हवामान अंदाज साठी केला जात आहे.  हवामानात होत असलेला बदल बघता शेतीच्या पद्धतीत बदल काय व कसा करायचा? कोणत्या तंत्रज्ञानावर आधारीत शेतीत बदल करायचा आणि कोणत्या तंत्राचा विकास व्हायला हवा ?शेतीत पद्धतीत काय बदल व्हायला हवेत ? हे ठरवले जाण्यासाठी हवामान केंद्र, वेधशाळा  यांची आकडेवारी व संशोधन  खूप मार्गदर्शक ठरणार आहे .आज जगभराच्या  हवामान चे निरीक्षण करण्यासाठी ३०पेक्षा अधिक उपग्रह आणि  २०० पेक्षा अधिक उपग्रह    हवामान शास्त्रातील संशोधनात उपयोगी पडणारी माहिती गोळा करत अंतरिक्षात फिरत आहे.  त्याचबरोबर समुद्रावर १००० पेक्षा अधिक तरंगती हवामान निरीक्षण गृह आहेत.  आज जगभरात स्वयंचलित व मानवचलित वेधशाळांची संख्या दहा हजार हून अधिक आहेत आणि त्या सर्व एकमेकाला जोडले गेले असल्यामुळे जागतिक आणि स्थानिक हवामानाचा संबंध आणि अंदाज वर्तले जाणे यासाठी यांचा वापर केला जात आहे.जगात कुठल्याही चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गाचे व तीव्रतेचे पूर्वानुमान या वेधशाळा जोडल्या गेल्यामुळे अधिक अचुकतेने केले जाऊ शकते.  अनेक दिवस आधीच अनुमाने लावली जाऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी आणि बचाव कार्य शक्य होते.

 

माॅन्सूनचे आगमन :

* मान्सून दरवर्षी साधारण २० मे ला अंदमानला जोर धरतो.

* दहा मेच्या आधी पडलेला पाऊस मौसमी पावसात धरला जात नाही.

            केरळमधील त्रिवेंद्रम सहित पाच ठिकाणच्या पाऊसमान मोजण्याच्या केंद्रामध्ये सतत दोन दिवस कमीत कमी एक मि.मी. पाऊस पडला की त्याच्या दुसर्‍या दिवशी मोसमी पावसाचे आगमन झाले असे जाहीर करतात.  

       माॅन्सुन आगमनाची वर्दी दरवर्षी त्रिवेंद्रमच्या भारतातल्या पहिल्या वेधशाळेतून दिली जाते.

भारतातला मोसमी पाऊस कसा येतो ?

*मोसमी पावसाचे ढग भारतात दोन मार्गांनी येतात एक अरबी समुद्रावरचा आणि दुसरा बंगालच्या उपसागरातला.

 

अरबी समुद्रावरचा मान्सून पश्चिम घाटाला अडतो आणि त्या ढगांतील जवळ जवळ सगळे बाष्प पावसाच्या रूपाने इथेच कोसळते. पुढे हे ढग पश्चिम घाटाच्या पलीकडे ओलांडून जातात त्यावेळी त्यांच्यात अत्यल्प  बाष्प असते.

      बंगालच्या उपसागरातील शाखा ही अगदी त्याच वेळी कार्यरत होते आणि चेरापुंजी ला पाऊस सुरू होतो.

    नंतर बंगालच्या उपसागराची शाखा हिमालयाला आदळून परत फिरते आणि पश्चिमेकडे वळते.

पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात आणि गंगेच्या खोर्‍यात पाउस सुरु होतो.

गंगेच्या खोऱ्यात पाऊस सुरू होतो तेव्हा ते सांगणे अवघड होते की हा आलेला पाऊस अरबी समुद्राच्या वार्‍यांचा की बंगालच्या उपसागराच्या वार्‍यांचा ?

       मोसमी पाऊस ही जागतिक प्रणाली आहे. सर्वच राष्ट्रांना मोसमी पावसाच्या अभ्यासात रस आहे, यासाठी वर्ल्ड मेटिओरोलोगिकल ऑर्गानिझेशन असून त्यात १०८ देश सदस्य आहेत.

     मोसमी वाऱ्यावर  म्हणजेच आपल्या देशातील पावसावर कुठला कुठला प्रभाव पडतो ?

   अगदी ठळकपणे सांगायचं म्हणजे…..

 तिबेटच्या पठाराचं  तापणं …

दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे…. सहारा वाळवंटावरून वाहणारे वारे…. सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि ब्ययनो आर्यस (अर्जेंटिना )अशा जगाच्या दोन टोकांच्या शहराच्या हवेचा दाब…. अंटार्टिका खंडावरील हवामान ….

पॅसिफिक महासागरावरील तपमान व हवेचा दाब ….

आणि अजून बर्‍याच……तरीही अजून संशोधन सुरुच आहे आणि वर्षागणिक

 ही यादी वाढतच  आहे  !!

 

*अवर्षण* म्हणजे एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न होणे म्हणजे अवर्षण होय. भारतीय वातावरण विज्ञान विभागाच्या व्याख्यानुसार सामान्य पर्जन्याच्या 50% पेक्षा जास्त तूट असेल तर तीव्र अवर्षण आणि 25 ते 50% तूट असेल तर मध्यम अवर्षण आहे असे म्हणतात.  जलसिंचन आयोगानुसार भारतात वार्षिक सरासरी पर्जन्य जर ७५ सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर तो प्रदेश अवर्षण प्रवण असतो.

*अतिवृष्टी* ज्या भागात २४ तासात ६४.५ ते ११४.५ मिलिमीटर पाऊस झाल्यास त्याला अतिवृष्टी असे संबोधले जाते.

       महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस दहिवड (जि.अहमदनगर) व म्हसवड (जि.सातारा) येथे पडतो अशा नोंदी आहेत. तसेच  सर्वात जास्त पाऊस आंबोली ला (७०७० मि.मी.)  पडतो. अहमदनगर पुणे सातारा सांगली व सोलापूर हे कायम अवर्षणग्रस्त जिल्हे मानले जातात. धरणं आणि कालव्यांमुळे या जिल्ह्यांमध्ये बागायती क्षेत्र भरपूर असले तरीही पावसाच्या व्याख्यानुसार हा भाग अवर्षणग्रस्त आहे.

 

गारपीट का आणि कशी होते?

     गारपीट बहुतेक वेळा उन्हाळ्यातच होते. समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहत येतात आणि येताना बाष्प घेऊन येतात आणि त्यातून ढग तयार होतात हे आपण जाणतोच. उन्हाळ्यात जमिनीलगतची हवा तापून ती प्रसरण पावते आणि या ढगांना वरवर ढकलत नेते.  अधिक वर गेल्यामुळे तिथल्या गारव्याने या ढगातले थेंब थंड होत जातात आणि गोठून  त्यांच्या गारा बनायला लागतात. तसेच  जमिनीपासून ९ते १२ किलोमीटरच्या उंची नंतर वाऱ्यांचे प्रवाह व घुसळण  त्या पेक्षा खाली असलेल्या वार्‍याच्या घुसळणी पेक्षा  वेगळीच सुरू असते. हे गोठलेले थेंब ( गारा)  खालच्या आणि वरच्या दोन्ही वाऱ्यांच्या प्रवाहात पोहोचून  ते खालच्या व वरच्या दोन्ही प्रवाहात वार्‍याबरोबरच घुसळले जातात. त्या वेळी तिथले बाष्पाचा थर त्यांच्यावर सतत चढत राहतात. थंड हवेमुळे हे थर ही गोठून त्यांचे पापुद्रे  गोठलेल्या थेंबावर चढत जातात. त्यामुळे   सुरुवातीला छोट्या असलेल्या या गारा आता बर्फाच्या गोळ्या सारख्या न राहता पापुद्रांनी बनलेल्या दिसतात.गारा आकाराने व वजनाने मोठ्या होत जातात.मग  खालच्या हवेच्या दाबापेक्षा त्यांचे वजन जास्त झाले की त्या जमिनीवर कोसळतात. वरच्या थंड हवेतून जमिनीवर येण्यापूर्वी त्या गरम हवेतून प्रवास करतात त्यामुळे काही प्रमाणात वितळतात ही. त्यामुळे जमिनी येताना पाणी व गारा एकत्र पडताना दिसतात.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top