पावसाळ्यात सुरुवातीला बरेच दिवस नदी, नाले, तलाव यात येणारे पाणी गढूळ असते, तसेच विशेषतः लोक वस्तीतून वाहणारे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून येताना बरेचसे प्रदूषण पण घेऊन येते. यामुळे पावसाळ्यात पिण्याच्या पाणी शुद्ध करण्याची गरज इतर वेळांपेक्षा अधिक भासते. तसेच अनेक गावात, दुर्गम भागात अवर्षणग्रस्त भागात ही गरज कायमच असते कारण जे आहे ते उपलब्ध पाणी प्यावे लागते. हे पाणी बहुदा पिण्याच्या गुणवत्तेचे असतेच असे नाही. त्यामुळे नैसर्गिक साधनांनी ते शुद्ध करून वापरले तर या लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. त्यांचा दवाखाना व औषधावरील खर्च वाचू शकेल तसेच आजारपणात बुडणारा रोजगार ही समस्या ही काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. शहरातील जनतेला शुद्धीकरण केंद्र आहेत, स्वतःचा फिल्टर विकत घरी नेणे शक्य आहे ,पण ग्रामीण भारताचे काय ? त्यांना स्वस्तातले स्थानिक उपलब्ध असलेले विशेषतः नैसर्गिक काय पर्याय देता येतील या साठी हा लेखप्रपंच. पाणी शुद्धीकरणासाठी पाणी तापवणे, पाण्यात तप्त लोह गोळा टाकणे, वाळूतून पाणी गाळून वापरणे ,हे पूर्वपार उपाय तर आहेतच पण अनेक वनस्पतीजन्य पदार्थांची गाळणी ही दुर्गम व ग्रामिण भारतातील बहुसंख्य लोक वापरताना सापडतात.
तुळशी, आवळा ,अंजन, हिरडा ,बेहडा, धामीन, वेलदोडा, ज्वारी ,लाल अंबाडी ,मसूर, कापूस, मेथी, उडीद ,वाळा ,कमळ, गवारीची शेंग ,शेवगा निर्मळी हे सर्व वनस्पतिजन्य वॉटर प्युरिफायर आहेत. राष्ट्रीय रसायण प्रयोगशाळा पाषाण येथील शास्त्रज्ञ ( आता निवृत्त) डाॅ. प्रमोद मोघे सरांनी यातील काही पर्यायांची पडताळणी व चिकित्सा प्रयोगशाळेत वीस पंचवीस वर्षापूर्वी केली आहे. वरील एक एक पदार्थ घेऊन प्रयोग केलेत . याने खरंच पाणी शुद्ध होतोय का? किती प्रमाणात होतं ? यासाठी किती वेळ लागतो? एका लिटर पाण्याचे शुद्धीकरणाला किती ग्रॅम मटेरियल लागते ? त्या त्या झाडाच्या कोणत्या अवयवाचा (मूळ, खोड, साल, पान, फूल, फळ पैकी )जास्त प्रभावी उपयोग होतो ? ह्या सर्वांच्या प्रमाणीकरणासाठी सरांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. अनेक दिवस त्यावर काम करून त्याचे व्यवस्थित रेकॉर्ड तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय.
सर्वत्र मुबलक उपलब्ध असलेला शेवगा व समुद्रकिनाऱ्याच्या जंगलात उपलब्ध होणारी निर्मळी दोघांच्या बिया उत्तम पणे पाणी शुद्ध करणाऱ्या आहेत. शेवग्याच्या बीची एक ग्रॅम पावडर एक लिटर पाणी निर्जंतुक करते. पाण्यातील क्षार ही कमी करते. म्हणजे टीडीएस कमी करते. त्याच बरोबर ती तुरटीचे ही काम करते ,पाण्यातला गाळ खाली बसवते. खूप महत्त्वाचे म्हणजे ही शेवग्याची पावडर पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण खूप कमी करते.
पाण्यात फ्लोराईड ची मात्रा एक ते दीड मिलीग्राम प्रति लिटर असेल तर ते आपल्या प्रकृतीला अत्यंत घातक असते. फ्लुराईडचे प्रमाण दिड मि.ग्रॅ. पेक्षा अधिक असेल तर त्याच्या वापराने एक एक करून तोंडातले दात पडत जातात. अनेक हाडे ठिसूळ होऊन संधिवात ,अस्थिभंग, पाठ दुखी हे विकार वाढतात, चालणेही मुश्कील होते. तसेच अनेकांना उच्च रक्तदाब, त्वचारोग ,वंध्यत्व ,थायराइड असे एक ना अनेक विकार होतात. भारतातील २२ राज्यात जवळ जवळ दोनशे जिल्ह्यात ही गंभीर समस्या आहे. महाराष्ट्रातील देखिल बीड, नांदेड ,परभणी, लातूर हे तर फ्लोराईड ग्रस्त जिल्हे आहेतच पण सिंधुदुर्ग ,ठाणे ,मुंबई ,कोल्हापूर ,औरंगाबाद, सांगली, नागपूर ,सोलापूर ,सातारा या जिल्ह्यांमध्येही बऱ्याच बोरवेल च्या पाण्यात फ्लुराॅईडचे प्रमाण दीड मिलीग्राम पेक्षा अधिक आहे.
डाॅ. मोघे सरांनी फ्लोराईड वर शेवग्याची बी ची भुकटी हा उपाय त्यांच्या अभ्यासातून सांगितला आहे. त्याचबरोबर इतरही काही साधे पण प्रभावी उपाय त्यांनी तपासले आहेत. तांदूळ, कडू लिंबाच्या पानांची राख, नारळाच्या शेंड्यां ची राख, शेवग्याची पाने, यां सर्वांची मिळून गाळणी तयार केली न् यातून पाणी काढल्यास फ्लोराइड तसेच कीटकनाशके गाळातच राहतात व पाणी दोषमुक्त होते.( तसेच शेवग्याच्या पानात वीस प्रकारची विटामिन्स व मिनरल असतात. यातून तर अर्थराइटिस बरा होतो असेही काही अभ्यासक सांगतात.)
समुद्रकिनाऱ्या जवळच्या जंगलात झाडीत निर्मळी सापडते. या निर्मळीची बी गंधासारखी दगडावर वा सहानेवर उगाळून पाण्यात टाकली की ती ही शेवग्याच्या बी सारखाच परिणाम देते. कर्नाटक,तामिळनाडू व केरळ राज्यात निर्जळी च्या बीयांचा मोठ्या प्रमाणात व्यापार व विक्री चालते.
शेवगा बी व निर्मळी बी या वितिरीक्त ही अनेक पारंपरिक उपाय जल शुद्धीकरणासाठी वापरले जातात.
दहा लिटर पाण्यात तुळशीची मुठभर पाने टाकून सहा तास सूर्यप्रकाशात ठेवली तर पाण्याची शुद्धता मोठ्या प्रमाणात वाढते. सूर्यप्रकाशामुळे जीवाणू व विषाणू मोठ्या प्रमाणात नष्ट होतात व तुळशीच्या पानामुळे गढूळता जाते. तसेच फ्लोराईड व त्यासारखे अपायकारक क्षार सुद्धा शोषले जातात आणि ते पाण्यातून कमी होतात. कडुलिंबाची पाने ही वरील प्रमाणेच काम करतात पण या पद्धतीत पाण्याला कडुलिंबाच्या पानांची कडवट चव येते. आवळा पावडर ही पाणी शुद्धीकरणासाठी खूप उपयुक्त व लोकप्रिय साधन आहे. आवळा पावडर मुळे पाण्यातील क्षार( TDS Total Dissolve Solids )कमी होतात. कोथींबीरीची ताजी पाने काढून ते रगडून पाण्यात रात्रभर टाकून ठेवले तर पाणी शुद्ध होते. जांभळांच्या बिया तसेच फणसाच्या बियांची पावडर पाणी शुद्धीकरणात खूप चांगली भूमिका बजावते. ज्येष्ठ मधाच्या पावडर मुळे ही पाण्याचा टीडीएस खूप कमी होतो. अनेक तलावात असलेल्या वॉटर लेली तलावातल्या पाण्यात विरघळलेला कार्बन डाय-ऑक्साइड काढून टाकून पाण्याची आम्लता कमी करतात. त्याने पाण्याची चव सुधारते. अजूनही अनेक विविध झाडांच्या बिया, मूळ, खोड! पान! फुलं, फळ, कंद, साल या विविध अवयवांचा जलशुद्धीकरणात वापर होत आहे. भारतातल्या सर्व समूहांकडे विशेषतः दुर्गम भागातील आणि आदिवासींकडे या संबंधीत असलेली माहिती जमवली तर याची यादी खूप मोठी होईल.
इतके असूनही या पदार्थांचे औद्योगिक व व्यावसायिक उत्पादन करण्यास मर्यादा येतात. याला काही मूळ कारणे आहेत. बऱ्याचशा वृक्षांच्या अवयवांच्या नैसर्गिक अर्कामध्ये अनेक रसायने असतात व त्यांची रचना ही गुंतागुंतीची असते त्यामुळे जलशुध्दीकरणात उपयोगी रसायन नेमके कोणते हे समजण्यास मर्यादा येतात. यावर सखोल संशोधन करणे गरजेचे आहे. तसेच किती पाण्याला किती पावडर वा किती पाला वापरायचा याचे प्रमाणीकरण झालेले नाही. तसेच औद्योगिक रसायनांच्या तुलनेत या नैसर्गिक घटकांमुळे होणारी पाणी शुद्धी करण्याची प्रक्रिया औद्योगिक रसायणांच्या तुलनेत सावकाश घडते. हीच ती महत्वाची कारणे आहेत, वरीलपैकी कोणतेही हर्बल जलशुध्दीकरण उत्पादन बाजारात येण्याला. मात्र यावर जगभरात संशोधन सुरू आहे. पुण्यातील NCL मधील जेष्ठ शास्त्रज्ञ डाॅ प्रमोद मोघे यांनी असे प्रमाणीकरण व डोसेस, त्यांची परीणामकता यावर बरेच संशोधन वीस वर्षापूर्वी ते निवृत्त होण्यापूर्वी करुन ठेवले आहे. पण ते पूर्णत्वाला जाईपर्यंत तरी वरील मर्यादा स्वीकाराव्या लागल्याने त्यांचे व्यवसायिक उत्पादनाला वेग येत नाही.
पाणी शुद्धीकरणासाठी कोळशाचा वापर
केरळ व तामिळनाडूमध्ये विहिरीत पिण्यासाठी पाणी शुध्द व चवदार मिळावे यासाठी दरवर्षी कोळशाची पावडर किंवा कोळसे टाकतात. पाणी शुद्धीकरणासाठी कोळशाचा वापर जगभरातच केला जातो. त्याची काही महत्वाची कारणं म्हणजे कोळसा पाण्यात विरघळत नाही, पाण्यातील उपयुक्त क्षार व खनिजे यांच्यावर कोळश्याचा काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे पाण्याची पोषण गुणवत्ता टिकून राहते. या उलट पाण्यात विरघळलेली विविध वायू व रसायने कोळशांच्या एडसॉर्पशन (Adsorption) पद्धतीने पाण्यातून वेगळे होतात. विशेष म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तणनाशके कीटकनाशके आणि रासायनिक खतांचे पाण्यात असलेले अंश कोळशामुळे मोठ्या प्रमाणात कमी होतात वा नष्ट होतात. यासाठी सक्रीय कर्ब (ऍक्टिव्हेटेड कार्बन) अधिक प्रभावी पणे काम करतो. हा सक्रीय कर्ब(activated carban )कोळसा पावडर वर थोडीशी प्रक्रिया करून मिळवता येतो. नारळाच्या शेंड्या व विशेषता करवंट्या पासून बनवलेला कोळसा दक्षिण भारतात पाणी शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. जपान सारख्या देशात ऍक्टिव्हेटेड कार्बनच्या कांड्यांचे व्यावसायिक उत्पादन होते व तेथील लोक बर्याचदा विशेषतः प्रवासाच्या वेळी या कार्बनच्या कांड्या जवळ बाळगतात. त्यामुळे कोणत्याही उपलब्ध पाण्यात ह्या कांड्या बुडवल्या की ते पाणी पिण्यालायक होते.