गवगवा बराच झाला, खलही बराच झाला, जागर तर सर्वत्र चालूच आहे प्राणी प्रश्न गंभीर होत आहे याचा ! सागराची घागर भरणाऱ्या नद्या जोडण्याच्या विचारापासून ते थेंबा थेंबाच्या नियोजनाच्या तंत्रज्ञानापर्यंत कितीतरी नवकल्पना न् तंत्रज्ञान येत आहे. कचऱ्याच्या डोंगरापासून ते समुद्राच्या तळापर्यंत पोहोचत असलेल्या प्रदूषणावर चिंता व्यक्त होत आहे .या सर्वात आणखी एक मोठा आवडता खेळ व्यक्तिगत पातळीपासून ते राष्ट्र पातळीपर्यंत सुरू आहे तो म्हणजे ‘याला मी नाही तो जबाबदार आहे’.
पाण्याचा प्रश्न स्थानिक ते वैश्विक आहे. जगातील वा देशातील इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. अनेक सामाजिक व आर्थिक समस्यांना पाणी प्रश्नाने जन्माला घातले आहे. पाण्याची समस्या तीन ओळीतच मांडता येईल. हजारो लाखो वर्षे साठलेले जमिनीतले पाणी संपत चालले आहे. जमिनीवरचे जास्तीत जास्त पाणी लवकरात लवकर प्रदूषित करण्याची स्पर्धा सर्वत्र लागली आहे. आकाशातून येणारे पाणी कितीतरी अनियमित झाले आहे. खरतर हवामान बदलाची पहिली झलक सत्तर च्या दशकातच दिसली, पण त्यावर विश्वास ठेवण्यासाठी एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक उजाडावे लागले आहे. तरीही अजूनही ते कुणी कुणी स्वीकारत नाही हेही दुर्दैवच ! पाणी प्रश्न जसा कमी पाऊस पडणाऱ्या भागात आहे तसाच कोकणासारख्या अति पाऊस पडणाऱ्या प्रदेशाचा पण आहे; तो प्रगत राज्यांचा आहेच आणि मागास राज्यांचाही आहे; तो राजस्थानचा आहे तसाच गंगा ज्या राज्यातून वाहते त्या उत्तर प्रदेश ,बिहार आणि बंगालचा पण आहे. तो ठीक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच दैनंदिन प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाणी वापर यामुळे तो अधिक गुंतागुंतीचा होत आला आणि अधिक गुंतागुंतीचा होत जाणार आहे. पाण्याचा प्रश्न उपलब्धतेचा आहे त्याचबरोबर गुणवत्तेचा आहे. तसेच जसा नद्या मधला गाळ आणि पूर यांच्या परस्पर संबंधांचा आहे तितकाच भयंकर प्रदूषणाचाही आहे. जमिनीवरील पाण्याच्या प्रदूषणाचा आहे त्यापेक्षा अधिक भयानक भूजल प्रदूषणाचा आहे. या सर्वापेक्षाही अधिक चिंता करायला लावणाऱ्या आहे सागराच्या पाण्याचे प्रदूषण !! पाणी जिथे जिथे उपलब्ध आहे तिथे तिथे समस्या आहे वाटपाची आणि व्यवस्थापनाची ही !!
या पाणी प्रश्नाचे परिणाम:
जीवसृष्टी : पाणी आहे तर पर्यावरण आहे, जीवसृष्टी आहे. म्हणजे पाणी हवेच. पण पाण्याचे दुर्भिक्ष न् प्रदुषण यांच्यामुळे प्राणी आणि वनस्पती दोघांवरही खूप परिणाम होतोय. नद्या, नाले ,तलाव आटत गेल्याने पाण्यातील विविध प्रजातींपैकी १२% प्रजाती आणि पाणी प्रदूषित झाल्यामुळे नष्ट झालेल्या प्रजातीं ८% आहेत. दिवसागणिक वर्षागनिक ही आकडेवारी वाढतच आहे. क्षारामुळे समुद्राचे पाणी अल्कलाइन असते पण प्रदुषणामुळे आता ते आम्लधर्मी होत चालले आहे. पावसाळा संपल्यानंतर थोड्याच दिवसात झऱ्यांचे आणि नद्यांचे पाणी आटते त्यामुळे जंगलातील जीवांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.त्यात ते मरतात वा ते हळूहळू मानवी वस्ती कडे पाण्यासाठी सरकू लागतात. भूजल पातळीखाली खालीच जात असल्याने झाडांच्या मुळांनाही पाणी मिळणे अशक्य किंवा अवघड होते, त्यातून ते ही वठू लागतात, मरु लागतात. यावर उपाय म्हणून आपण दरवर्षी वृक्षारोपण करतो. पण जमिनीत पाणीच नसल्यामुळे जास्तीत जास्त ती पावसाळ्या असेपर्यंतच जगतात.
पाणी आणि आरोग्य
पाण्याचे दुर्भिक्षासंबंधी शेतीची उत्पन्न व शेतकऱ्यांच्या व्यथा अशी चर्चा होत राहते, पण या पलीकडे खूप गोष्टींवर पाणी विषयाचे परिणाम होतात. पहिला मोठा परिणाम आरोग्यावर होतो. पाण्याचे दुर्भिक्ष असेल तेव्हा मिळेल ते पाणी प्यावे व वापरावे लागते. माणसाला होणार्या एकूण आजारांपैकी ७०% आजार हे पाण्याच्या गुणवत्तेमुळे होतात. WHO च्या आकडेवारीनुसार दर आठवड्याला जगभरात दूषित पाण्यामुळे तीस हजार मृत्यू होत आहेत. अर्थातच भारत, चीन आणि आफ्रिकन देशातच हे मृत्यू मोठ्या प्रमाणात आहे. शेतीतील रसायणे व किटकनाशके यांच्यामुळे होणार्या पाणी प्रदुषणामुळे कॅन्सर सारख्या रोगांनी मनुष्याला घेरले आहे.
पाणी आणि स्थलांतर
आरोग्याइतकाच महत्वाचा मुद्दा पाणी उपलब्ध नसल्याने होणाऱ्या स्थलांतराचा आहे. त्याचा आखो देखा प्रत्यय आपण दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन च्या वेळी घेतला आहेच. भारताच्या सर्व शहरांमधून जे लोक घरी परतत होते, त्यांची संख्या लक्षणीय होती. जगभरात आजच्या तारखेला एक तृतीयांश लोकसंख्या पाण्यासाठी आपला गाव, आपला भाग ,आपले लोक, आपले प्रांत सोडून बाहेर पडलेले आहेत. अनेक जागतिक अभ्यासकांच्या मते २०३० पर्यंत हीच आकडेवारी ६६टक्क्यांपर्यंत जाणार आहे. एकंदरीतच पुढच्या दशकात जगात बरीच उलथापालथ पाण्यामुळे होणार आहे. आपले लोक, समाज ,प्रांत सोडतानाच त्या संस्कृती आणि परंपरा ही मोडीत निघणार आहेत. अशा हजारो लहान लहान संस्कृती यामुळे नष्ट होणार आहेत. त्याचबरोबर पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण होऊन मोठे संघर्ष सुविधांवरील तणाव आणि सर्व समाजाच्या तणाव वाढणार आहे. हे आवरणे अवघडच नाही तर अशक्य होईल.
पाणी आणि शिक्षण
स्थलांतर व पाणी प्रश्नाचा शिक्षण व साक्षरतेवर ही मोठ्या परिणाम होतो. पाण्याच्या शोधात कुटुंबाबरोबरची फरपट, त्यातून शाळेला जायलाच न मिळणे याची ही संख्या बऱ्यापैकी आहे. हे चित्र बिहार, उत्तर प्रदेश ,मराठवाडा, विदर्भ येथेच दिसते असे नाही तर पुण्यापासून ४० किलोमीटरवरही मी हे चित्र स्वतः अनुभवतो आहे. प्राथमिक शिक्षणाची ही अवस्था तर माध्यमिक व उच्च शिक्षणाबाबतचे चित्र पूर्ण अंधारमय आहे.
पाणी आणि अर्थकारण
पाणी नाही तर शेतात काही नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, शेती संबंधित छोटे-मोठे व्यवसायिक यांचे अर्थकारण ठप्प होते. त्यामुळे त्या गावातील भागातील व्यापारी बँका आणि तत्सम सर्वांचे चलन वलन थांबते. अर्थकारणाचे पूर्ण तीन तेरा वाजतात. भारत देश इतका मोठा आहे की दरवर्षी ही परिस्थिती कमीत कमी तीन ते पाच राज्यात असतेच असते. याचा परिणाम वैयक्तीक पासून तर गाव,राज्य,देश पातळीवरील अर्थकारणावर प्रत्यक्ष व आता प्रत्यक्ष होतच असतो.
पाणी समस्येबाबतचा विविध अहवालातील माहिती गंभीर करणारी व धडकी भरवणारी आहे. २०१६ला पाणी विषयक अहवालात ‘नीती आयोगाने’ माहिती दिली आहे की भारताच्या २५% नद्या आटल्या आहेत म्हणजेच बारमाही सुकल्या आहेत. पंधरा हजार नद्यांपैकी साडेतीन ते चार हजार नद्या आटल्यात !!, ३० लाख तलावांपैकी दहा लाख तलाव नामशेष झाले आहेत. त्यांचे अस्तित्व च राहिली नाही. तिथे पाणी तर नाहीच पण त्यावर विविध अतिक्रमणे ही झाली आहेत. उरलेल्या २० लाख तलावांपैकी निम्मे तलाव पाणी साठ्याबाबत गंभीर अवस्थेत आहेत. उत्तर प्रदेश मधील ४०ते ५० हजार विहिरी दरवर्षी कोरड्या पडत आहेत. झारखंड, बिहारमधील तसेच आंध्र, तेलंगांमधील ५०,००० पेक्षा अधिक बोरवेल वर्षाला निरोपयोगी होत आहेत. महाराष्ट्रात बाबतही खूप गंभीर नोंद आहे. भारतातील एकूण धरणांपैकी ४६ टक्के धरण एकट्या महाराष्ट्रात असताना महाराष्ट्राच्षा ५२% जमिनीचे वाळवंट होण्याकडे वाटचाल होत आहे. पंजाब आणि हरियाणा तर पाण्याच्या बाबतीत कडेलोटाच्या फक्त काही पावले अलीकडे आहेत.
पाणी आणि मी
अशा सर्व पार्श्वभूमी फक्त सरकार, स्वयंसेवी संस्था किंवा कंपनी सीएसआर यावर अवलंबून न राहता प्रत्येकाला यासाठी योगदान द्यावे लागणार आहे. वैयक्तिक पातळीवर, समाज म्हणून आपल्याला यावर जे जे आणि जिथं जिथं करता शक्य आहे तेथे करणे लगेच सुरू केले पाहिजे.पहीला टप्पा ‘Respect Water’ पाण्याचा आदर करणे शिका. त्यातून स्वयंशिस्त निर्माण करणे व ती कृ तीत आणणे .सर्वच मानवी संस्कृतीत मूल्य असले तरी भारतीय परंपरा आणि संस्कृती ते इतर कोणाही पेक्षा कितीतरी अधिक आहेत. आपल्या अनेक सण उत्सव व्रते ही निसर्गातल्या अनेक बाबींच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आहेत. पाण्याविषयी तर सर्वोच्च आदराने कृतज्ञता आहे. अगदी कोणत्याही पूजेची मंगल कार्याची सुरुवात आपण मंगलकलशाच्या पूजेने करतो, ज्यात पाणी असते. त्यानंतर मग आपण देवांची नावे आणि आदर व्यक्त करतो हे खरय ..पण इतकं असूनही ते आता केवळ कर्मकांड उरलं आहे. ते संस्कार किंवा जीवनमूल्य अजिबात राहिलेलं नाही. कारण बघा ना सर्वात निशिःध्द असलेलं मलमूत्र ओढा नदीत सोडून देऊन आपण नद्यांचे गटार केलंय. किती दांभिकता आहे ही ! किती क्रूर न्याय करतोय ! तर… सर्वप्रथम आपण पाण्याला सर्वश्रेष्ठ आदर देऊया. पैशाला पाय लागला तर आपण लक्ष्मीचा अपराध मानतो आणि पाया पडतो तसा किंबहुना त्यापेक्षा अधिक आदर पाण्याला दिला जाऊ लागला तर त्याच्या वापराबाबतची स्वयं शिस्त यायला लागेल. यातून पुढे पाणी जपण्याबाबत व प्रदुषणापासून वाचवण्यापर्यंत वाटचाल होईल. व्यवस्थापन अधिक काटेकोर आणि विचारपूर्वक होईल.
पुढच्या टप्पा ‘Restore Water’पाणी साठवणे. सरकार व संस्था धरणे, बंधारे, तलाव या माध्यमातून पाणी साठवण्यासाठी गेली ७५ वर्षे काम करत आहे. आता आपण वैयक्तिक पातळीवर पाणी साठवण्याचे काम केले पाहिजे. रेन वाॅटर हार्वेस्टींग.. आपापल्या घराच्या छतावरचे पाणी जमिनीत खडकात साठवण्यासाठीचे काम सक्तीने करायला हवे. बंगला,घर, अपार्टमेंट वरून खाली येणारे पाणी पाईप द्वारे जमिनीवर पडते, ते एक तर वाहून जाते किंवा मातीत जिरून नंतर बाष्पीभवन होऊन उडून जाते. पाणी मुरले तरी ते एकूण पावसाच्या पाण्याचे चार ते आठ टक्के इतकेच खडकांपर्यंत जाऊ शकते. हेच सर्व पाणी आपण जिरवू या. यासाठी कृ ती अगदी सोपी आहे. बोअरवेलच्या केसिंग पाईपला चार इंची व्यासाचे छिद्र पाडून छतावरुन येणारे पाणी पाईपने सोडून दिले तर ते सरळ खाली जाऊन खडकात साठवून राहील. तेच आपल्याला हवे तेव्हा वापरता येईल. सर्व घरातून जेव्हा असा उपाय होईल तेव्हा भूजलाची पातळी लक्षणीय वाढलेली असेल. आता प्रत्येक घराला बोरवेल असेलच असे नाही. अशावेळी घराच्या बाजूलाच शोष खड्डा घेऊन त्यात हे पाणी सोडले की तेही जमिनीत हळूहळू जिरत जाईल. घर बांधायला लाखो रुपये खर्च करत होतो या रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी जास्तीत जास्त सात आठ हजार रुपये पर्यंत खर्च करावे लागतात. यातून आपण पाण्याबाबत स्वयंपूर्ण होतानाच सामाजिक कर्तव्य पण पार पाडतो. याला लागते ती इच्छाशक्ती. घर गावठाणात असो की गावाबाहेर, बंगला असो की शेतातले सुद्धा घर असो हे व्हायलाच हवे.
तसेच मॅजिक पीट वा शोषखड्डा द्वारे सांडपाणी घराजवळच खड्डा घेऊन त्यात वाळू, खडी, छोटे मोठे दगड यांचे थर देऊन सांडपाणी त्यावर सोडून दिले की ते फिल्टर होत जातेव जमिनीत मुरते. सांडपाण्यातील सर्व घटक विघटन होऊन मातीत मिसळून जातात. जमिनीत पाणी गाळून जाते .यातूनही भूजल वाढण्यास खूप मदत होते. खेडेगावातही नळाने पाणी येत असेल किंवा टँकर येत असेल तरी मानसी ५५ लिटर पाणी मिळते. म्हणजे कुटुंबाला 200 लिटर प्रति दिनी मिळते. त्यातले दररोज दीडशे लिटर सांडपाणी तयार होऊन ते गटारात सोडले जाते. त्याऐवजी शोषखड्ड्यामुळे ते जमिनीत जाईल.वस्तीत शंभर घरे असतील तरी दिवसाला पंधरा हजार लिटर पाणी शोष खड्ड्याद्वारे जमिनीत जाईल. हेच उपाय सार्वजनिक इमारतीसाठी करण्याचा आग्रह धरला पाहीजे त्यासाठी सर्व श्रमदान ,वस्तू दान करूनही रेन वाॅटर हार्वेस्टींग करुन घेणे आवश्यक आहे.
आपपल्या शेतातही पाणी साठवणे, मुरवणे यासाठी विविध उपाययोजना करणे अत्यावश्यक म्हणून केले पाहीजे.
तिसरा टप्पा ‘Reduce Water’ म्हणजेच पाणी वाचवणे. घरात, शेतात ,व्यवसायाच्या ठिकाणी, कारखान्यामध्ये पाणी वाचवलेच गेले पाहीजे. घरात पाणी वाचवण्यासाठी ,नळांना इरिएटर्स लावून नळातील प्रवाह कमी केला पाहीजे. बहुमजली इमारतीत जसजशी पाण्याच्या टाक्याची उंची वाढत जाते तसतसे पाण्याचे प्रेशर वाढत जाते. सगळ्यात वरच्या मजल्यावरील नळाला येणारे पाणी सर्वात खालच्या मजल्यावरील नळाला येणार्या पाण्यापेक्षा कमी असते. खरं तर कोणत्याही नळातून बाहेर पडणारे पाणी चार ते सहा लिटर प्रति मिनिट इतके पुरेसे असते. परंतु बहुमजली इमारतीत वर दिलेल्या कारणामुळे नळातून येणारे पाणी पंधरा लिटर प्रति मिनिट पासून ३५ते ४० लिटर प्रति मिनिट इतके असते. त्यामुळे एक मिनिट वर जरी नळ चालू राहिला तरी दहा ते तीस लिटर पाणी सहज हात वा भांडी धुताना सहज वाहून जाते. एका कुटुंबात चार माणसे असतील तर दिवसभरात अगदी सर्वांचा मिळून पाच मिनिटे तरी नळ वापरला गेला की ५०ते १०० लिटर पाणी असे वाया जाते यावर उपाय आहे. नळांना इरिएटर बसवणे ! हे नळाच्या इनलेट वा आउटलेट दोन्ही ठिकाणी बसवता येतात. फक्त ती वेगवेगळे असतात. मात्र त्यामुळे ४०ते ७०% पाणी वाचते. पुण्यासारख्या शहरात लाखो घर आहेत. घरटी एका नळाला जरी एरिएटर बसवला तरी रोज सर्वांचे मिळून कोट्यावधी लिटर पाणी वाचेल. हे एरीएटर्स ४० रुपयांपासून दीडशे रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.
आपण घरातील स्वच्छतेसाठी पाणी वापरतानाही खूप काटकसर करू शकतो. नव्हे ती केलीच पाहिजे. टॉयलेटचा फ्लश केल्यावर ते स्वच्छ होते तरी रोज ते ॲसिड टाकून धुतले पाहिजे का? फरशी धुण्या ऐवजी पुसली तर ते किती पाणी वाचेल. हीच बाब टू व्हीलर किंवा फोर व्हीलर धुण्या बाबत.या आणि अशा अनेक गोष्टी बाबत आपण वैयक्तिक पातळीवर पाण्याची काटकसर केलीच पाहिजे.
अप्रत्यक्ष पाणी वापर ( Water Foot print): कोणतीही वस्तू मग ती निसर्गातून मिळणारी असो की छोट्या-मोठ्या कारखान्यात बनणारी असो त्यासाठी पाणी खर्च होतेच. तोच आपला पाण्याचा अप्रत्यक्ष वापर असतो. उदा. एक कप (१०० मि.लि.)चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी १४० लिटर पाणी निसर्गातून खर्च झालेले असते. हे पाणी, त्यात असलेली साखर, दूध आणि चहा पावडर बनण्यासाठी लागलेले असते. तसेच आणखी एक उदाहरण एक सुती शर्ट बनण्यासाठी ४००० लिटर तर एक जीन्स पॅन्ट बनवण्यासाठी साडेदहा हजार लिटर पाणी लागते. यावरुन लक्षात येतो आपला पाण्याचा अप्रत्यक्ष वापर!! आपल्याला खरच किती वस्तू लागतात आणि आपण संग्रह कितीचा करतो ? त्यानिमित्ताने किती लाख कोटी लिटर पाण्याचा आपिण अपव्यय करतो हे कळते. यावर कृती म्हणून वस्तूंचा वापर आणि खरेदी अतिशय कमी व्हायला हवी, पाणी वाचवण्यासाठी हा विचार खूप खूप आवश्यक आहे, या विषयावर स्वतंत्र लेख होईल, तो पुन्हा कधीतरी.
शेतीतील पाणी वाचवणे..
जगातील आणि विशेषतः भारतात उपलब्ध होणाऱ्या पावसाच्या आणि नद्यांच्या एकूण पाण्यापैकी ८०ते ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. आठ ते दहा टक्के पाणी दैनंदिन गरजा आणि कारखानदारी यासाठी वापरले जाते. भूजल संपण्याचे मुख्य कारण शेतीच आहे. शेतीत पाण्याचा अति गैरवापर आहे .२००वर्षात शेती पाणी विषयक इतके तंत्रज्ञान विकसित होऊनही आजही पाट पद्धतीनेच पाणी देणे सुरू आहे. जिथे ड्रिप किंवा सूक्ष्म सिंचन वापरले जाते तिथेही फक्त साधनं आधुनिक आहेत पण शेताला एकूण पाणी पाटपध्दती सारखेच दिले जाते. बघा ना, प्रत्येक पिकाला त्याची स्वतःची एक निश्चित गरज असते तितकेच पाणी त्याला गरजेचे आहे. पण एका सर्वेक्षणात असे सापडले की ९८% शेतकऱ्यांना पिकाची पाण्याची गरज किती हेच माहीत नाही. अशा स्वरूपात सांगताच येत नाही. असा विचारही मनात येत नाही तर त्यानुसार कृती करणे खूपच दूर. शेतीत दिल्या जाणाऱ्या अशा पाण्यांपैकी 80% पाणी बाष्पीभवन व मुरण्यात जाते. हे सर्व पाणी वाचवणे शक्य आहे, ते वाचवलेच पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञान न् साधनं उपलब्ध आहेत. तसे ते फारसे खर्चिक नाहीत पण त्यासाठी वनस्पतीशास्त्र, मृदा शास्त्र आणि सिंचनाची साधने यांचे प्राथमिक का होईना ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे, हे प्रत्येक शेतकऱ्याने घेणे आवश्यक आहे. त्यांना अनुदाने देताना, कर्ज देताना किंवा शासकीय सवलती देताना अशा प्रशिक्षणाच्या सक्तीची अट घातली गेली पाहिजे. सुक्ष्म सिंचनांची साधने वापरणे, सॉईल मोईश्चर सेन्सर वापरणे, मोबाईल ॲपवर आधारित शेतीला पाणी देणे अशा विविध पद्धती शेतीमध्ये पाणी वाचवण्यासाठी वापरता येतील. यातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत करणे शक्य आहे. त्यासाठी सर्वच समाजाने शेतकरी असो किंवा नसो आग्रह धरला पाहिजे.
Restrict Pollution
पाणी संवर्धनासाठी पुढचा उपाय पाणी प्रदूषित न होवू देणे. पाणी प्रदूषणाबाबत मोठा गैरसमज आहे तो म्हणजे हे प्रदूषण इंडस्ट्रीज मुळे होते. खरंतर एकूण प्रदूषणाच्या पंधरा ते वीस टक्के प्रदुषण फक्त इंडस्ट्रीमुळे होते व ८०ते८५ % प्रदूषण सामान्य माणसांमुळे होते. कारण महानगरापासून गावापर्यंत सर्वत्र मानवी मलमूत्र ओढे नाले व नदीत सोडले जाते. हेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आहे . हे विघटन( Decompose) होणारे मटेरियल असले तरी प्रदुषकांचे मोठ्या मर्यादेनंतर ते विघटन होणे अशक्य होते. या मलमुत्रा बरोबरच दररोज मानसी ४० ग्रॅम नॉन ऑरगॅनिक केमिकल पाण्यात सोडले जाते. ते म्हणजे टूथपेस्ट, डिटर्जंट ,अंगाचा साबण, शाम्पू ,टॉयलेट क्लीनर, फ्लोअर क्लीनर या सगळ्यांच्या माध्यमातून !! पुण्याची लोकसंख्या ५० लाख आहे त्यामुळे सर्वांचे मिळून दोन लाख किलो हे केमिकल्स पाण्यात जात असतात !! रोज दोन लाख किलो !!. हा आकडा फक्त पुणे शहराचा आहे,यात पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा असे सर्व धरले तर किती टन केमिकल्स होतात ते पहा. हे केमिकल्स त्यांची विघटन होणे तर अशक्यच, पण ऑरगॅनिक मॅटरचेही त्यामुळे विघटन होणे थांबते. यावरुन समजत असेल की आपणच कितीतरी मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण करतो. त्यात ऑफिसेस, आयटी कंपन्या, मेकॅनिकल कंपन्या, हॉस्पिटल्स यांच्या सांडपाणी धरलेले नाही. हे सर्व सांडपाणी नदीतून वाहत जाते. नदीकाठची शेती व जलस्त्रोत विहिरी बोरवेल्स प्रदूषित करत जाते. याचबरोबर आपण तयार करत असलेला घनकचरा हा सुद्धा जल प्रदूषणास कारणीभूत आहे. कचरा सडून ‘लिचेट’ नावाचा विषारी द्रव तयार होतो. तो जमिनीत मुरून भूजल विषारी करतो. तसेच जमिनीच्या उतारांवरुन वाहून येऊन पुढे नदी नाल्यात येऊन पाण्यात मिसळतो आणि त्यालाही ही विषारी करते.
यावर आपल्याला नुसत्या सवयी बदलल्या किंवा नव्याने सवयी लावल्या तरी यातील बरेच प्रदूषण नियंत्रणात येईल. आपल्याला सर्वप्रथम कचरा वर्गीकरणाची सवय अगदी काटेकोरपणे आणि सर्वांनीच लावणे आवश्यक आहे. माझ्यासारखे बरेच लोक ओला कचरा घरातल्या व टेरेसवरील कुंड्यातच जिरवतात. अगदी कंपोस्ट करायची सुद्धा गरज नाही. कचरा कुंडीत टाकला न् वरून थोडी माती लोटली तरी दुर्गंधी न येता सात आठ दिवसात ते त्याचे खत होऊन जाते. याबरोबरच सोसायटीतील सर्व कचरा श्रेडरमध्ये बारीक करून त्याचे खूप कमी दिवसात खत तयार करता येते. मला लोकांची एक गंमत वाटते जेवण संपेपर्यंत ताटातले व भांड्यातले अन्न पूर्णब्रह्म असते आणि जेवण झाल्यावर लगेच त्याचे नाव खरकटे असे होते. त्याला हात लावणे सुद्धा शूद्रपणाचे वा किळसवाणे वाटू लागते आणि त्याला कचरा घाण असे संबोधन सुरू होते. हा दृष्टिकोन सर्वांना बदलायचा आहे आणि दुर्गंधी यायच्या आत त्या ह्याच अन्न घटकांचे विघटन सुरू केले तर ते सर्वोत्तम खत होते .मुख्य म्हणजे कचऱ्याची उत्तम विल्हेवाट लागते. यावरच थोडी कल्पकता वापरुन ,थोडे अधिकचे कष्ट घेवून टेरेसवर भाजीपाला बाग किंवा फुलबाग फुलवता येते, याची अनेक उदाहरणे ही आहेत.
प्लास्टिक व सर्व प्रकारचे पॅकिंग मटेरियल साठवून ठेवून महिन्यातून एकदाच कचरावेचकांना द्या. तो हमखास रीसायकल ला जाईल असे पहा. पुण्यात घरटी २००ते४०० ग्रॅम कोरडा कचरा रोज तयार होतो. एकत्रितपणे शहराचा रोजचा दोन कोटी किलो इतका होतो. आपल्याला हा सर्व कचरा रिसायकलला आपण देऊ शकतो. कचऱ्याची रोज विल्हेवाट लागेल. पुनर्वापरातून राष्ट्रीय संपत्ती वाचेल, निसर्ग संपत्ती वाचेल. हवा जमीन व जलप्रदूषण हे सर्वच नियंत्रणात येतील. इंदोर ,लातूर यासारख्या शहरांमध्ये शंभर टक्के कचरा ची विल्हेवाट महानगरपालीकेच्या यंत्रणेकडून त्याच दिवशी लावली जाते.
ऑरगॅनिक जीवनशैलीचा अवलंब व उल्लेख केलेले रोजच्या वापरातील सर्वच रसायनांना सेंद्रिय नैसर्गिक रसायने हा पर्याय आहे. ऑरगॅनिक अंगाचा व कपड्याचा साबण बाजारात उपलब्ध आहे. कपडे भिजत घालण्यासाठी चा डिटर्जंटही ऑरगॅनिक उपलब्ध आहे. तसेच तो घरीही आपल्याला रिठापासून बनवता येतो. टाॅयलेट क्लिनर्स व फ्लोअर क्लिनर्स त्यालाही पर्यायी सेंद्रिय क्लीनर्स उपलब्ध आहेत. हेही क्लिनर घरी सुद्धा बनवता येतात. हे मिश्रण बाजारात उपलब्ध आहेच पण घरी ही फळांच्या साली,गुळ यांचा वापर करुन बनवता येते. हे इकोएन्झाईम स्वच्छतेसाठी तर वापरता येतेच पण झाडांवर फवारून खत म्हणून सुद्धा वापरता येते. कचऱ्याचे कंपोस्टिंग वेगाने होण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. विनामूल्य किंवा अति अल्प किमतीत निसर्ग पूरक क्लीनर वापरले तर पाणी प्रदूषण कमी करण्यास आपला हातभार लागेल.
बंगले ,एक-दोन मजली मध्ये इमारत घरांच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी सेप्टिक टॅंक ही संकल्पना आहे. पण आजकाल जागेचे अभावी टॉयलेट सहित सर्व सांडपाणी सरळ ड्रेनेज लाईफ मध्ये सोडून देण्याची वाईट पध्दत सुरू आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागात त्याने पाणी प्रदूषण, दुर्गंधी, डास, रोगराई यास खूपच चालना मिळते. तसेच सेप्टीक टॅंक असले तरीही तो गाळाने भरल्यावर स्वच्छ करण्यासाठी साधने व उपाय ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. याला एक पर्याय आहे. सेप्टिक टॅंक च्या तुलनेत खूप छोट्या आकारमानाचे व किमतीतही तुलनेने कमी रकमेचे असे डायजेस्टर्स विकसित झाले आहेत. पुणे परिसरात ग्रामीण भागात त्यांचा वापर सध्या वाढत आहे. यात कोणत्याही प्रकारचा गाळ तयार होत नाही. तसेच दुर्गंधी नसलेले पाणी त्यातून बाहेर पडते, असे हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे आणि असे सर्व उपाय पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी वापरता येणे सामान्य माणसाला शक्य आहे.
Recycle Water
सांडपाणी पुनर्वापर किंवा सांडपाणी प्रक्रिया: सांडपाणी प्रक्रिया नैसर्गिक पद्धतीने करणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारचे खर्चिक ट्रीटमेट प्लांट न बांधता वाहत्या नाल्यात, ओढ्यात, नदीत, तळ्यात हे करणं शक्य आहे. पण ते लोकसहभाग व समुहाने करण्याचे काम आहे. गावच्या, वस्तीच्या, हाऊसिंग सोसायटीच्या बाजूने वाढणारा ओढा सर्वांनी मिळून त्यावर तज्ञांच्या मदतीने काम केले तर ते काही विशिष्ट पान वनस्पती वापरून खास बॅक्टेरिया निवडून त्यांचे कल्चर वापरून व इतर काही तांत्रिक बाबींचा वापर करून विना ऊर्जा, विना केमिकल, विना देखभाल दुरुस्ती, अत्यल्प भांडवली खर्च यातून सांडपाणी वापरण्या योग्य करणे शक्य आहे. गावागावात पाणी अडवणे, जिरवणे ही चळवळ रुजली आहे. आता सांडपाण्याचा पुर्नवापर आणि पर्यावरणाची पुर्नस्थापना अशा योजना घेऊन गावातील पाण्याची उपलब्धता वाढवते. पाण्यामुळे पाण्यातील व जमिनीतील जैवविविधता ही सांभाळता येईल. वृद्धिंगत करता येईल. शेतात किंवा गावात ही घरा मागच्या जागेत सांडपाण्यावर परसबाग संकल्पना अनेक ठिकाणी आहे, ती ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ती स्वीकारणे. सांडपाण्याच्या सदुपयोग बरोबर सेंद्रिय अन्न मिळण्याचे ही मिळवणे हा फायदा पदरी पाडून घ्यावा. नवनवीन तंत्रज्ञान अनेकांच्या अनुभव कामाची यशस्वीता हे समजण्यासाठी व सर्वांनी एक दिल्याने काम करण्यासाठी गावागावात हरिनाम सप्ताह प्रमाणेच ‘जलसप्ताह’ ‘जल व कृषी सप्ताह’ आयोजित केले पाहिजेत. शाळांमधून पाणी व पर्यावरणाची उपक्रम शिक्षकांनी पुढाकार घेऊन केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी त्याच सहभागी होईल आणि उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा पाईक कसा होईल यासाठीचे प्रयत्न करायला हवेत. प्रत्येक कॉलेजमध्ये पर्यावरण मंडळ स्थापन व्हायला हवे .पूर्वी वाङ्मय मंडळ असायची तशी !!कॉलेजेस मध्ये पाणी व पर्यावरण विषयक अध्यासने निर्माण करण्यात यावे. वृत्तपत्रांनी खेळ विषयाला एक पान समर्पित केले आहे ,तसेच पाणी व पर्यावरणाच्या बातम्या व लेखन साठी एक एक स्वतंत्रपणे समर्पित करावे. ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे स्वच्छ शाळा अभियानात आता हरित शाळा अभियान यांना परावर्तित व्हायला हवे.
असे अनेक व्यक्तीगत व सामुहीक उपक्रम व उपाय करुन जलसंवर्धनात शहरी व ग्रामिण भागातील प्रत्येकाला जलसंवर्धन करता येईल. हे केलेच पाहीजे..जलसंवर्धन हा जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवा.
सतीश खाडे,
जलअभ्यासक ( ९८२३०३०२१८)
( लेखक ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत)