Satish Khade

गवत, वणवे आणि भूजल

डोंगरावरच्या गवताला लागणारे वनवे विझवणे चालू ठेवले आणि गावात उन्हाळ्यातही डोंगरातून झरे वाहू लागले, ही वस्तुस्थिती आहे कोकणातल्या एका गावची, रायगड जिल्ह्यातील भिवघर गावची. २००५ पूर्वीची गोष्ट. भिवघरचा डोंगर बोडखा कधीच झाला होता. तुरळक आंब्याची आणि तोडणे अगदीच अशक्य असलेली काही झाड सोडली तर डोंगर गवतानेच झाकलेला असायचा. गाव सोडून इतरांना पावसाळ्यात खूप मोहक हिरवा वाटायचा. गावातल्या लोकांना मात्र सतत धास्ती. पावसाळ्यात भराभर वाढणारे गवत न् उन्हाळ्यात वनवे लागून होणारा जाळ सगळ्या गावाला घाबरून टाकायचा. कारण त्यात पूर्ण डोंगर होरपळायचा. मोठी झाडं झाडावरच्या कैऱ्या आणि इतर फळ सर्वच भाजून निघायचे. सर्वजण आपले प्राण आणि नंतरआपल्या जनावरांचे प्राण वाचवण्यातच अर्धमेले व्हायचे . पण २००४साली तर भर दुपारी वनवा पेटला बघता बघता काही समजायचे आत पाच मिनिटात तो आदिवासी वाडीत पोहोचला. संपूर्ण वाडी जनावरांसहित जळाली. माणसं कशीबशी वाचली. गाव हादरलं. स्वयंसेवी संस्था शासनाने मदत केली खरी पण आता गावातल्या चार-पाच तरुणांनी मात्र या प्रश्नाला भिडायचं ठरवलं. यावर कायमस्वरूपी काय करता येईल यावर विचार करायला सुरुवात केली. वनवा येऊ नये यासाठी खरं तर अगदी साधा पण खात्रीचा उपाय म्हणजे जाळ रेषा मारणे. हे म्हणजे काय तर डोंगरातील रस्ता, पायवाट ही सीमारेषा धरून त्याच्या बाजूचे दहा-पंधरा फूट रुंदीचे गवत काढून घ्यायचे. खाली राहिलेले बुडखं पूर्ण जाळून टाकायची. यामुळे कुठून जाळ आलाच तर इथे गवत असणारच नाही जळण्यासाठी आणि मग तो जाळ, वणवा तिथेच विरून जाईल व या पट्ट्याच्या पलीकडे गवताला आग लागणार नाही.

केशव पवार, श्याम, पांडू वाघमारे ,किशोर पवार या तरुणांनी ठरवलं की पावसाळा संपल्यावर गवत वाळू लागलं की ते काढून घेऊन ठीक ठिकाणी जाळ रेषा मारूनच घ्यायच्या. हे काम नोव्हेंबर मध्येच करायला हवे म्हणजे मग पुढचे सहा सात महिने आगी ची भीती संपलीच. झालं नोव्हेंबर मध्ये आवश्यक त्या पट्ट्यातलं गवत काढून घेतलं न्  एक दिवस सकाळीच ही आठ दहा मंडळी गेली जाळ रेषा मारायला. या पूर्वीचा त्यांना अनुभव नव्हता आणि अनेक वर्षे जाळ रेषा कोणी मारली नव्हती, त्यामुळे मार्गदर्शन करणारे ही कुणी नव्हते. त्यामुळे पहिल्या दिवशी खूप तारांबळ उडाली. संकटातून सुटका करण्याच्या नादात संकटच येऊन आदळते की काय असे झाले. दुसऱ्या दिवशीपासून मात्र सकाळ ऐवजी संध्याकाळी जाळ रेषा मारायला घेतली. वाट धरून हवेची दिशा आणि हवेचा वेग पाहून विशिष्ट पट्ट्यातील गवत जाळणे, जाळ इतरत्र पांगु लागला तर गोणपाटाने फटके मारून विझवणे, वगैरे उपाय करून ते जमवलं, जाळ रेषा आखली गेली. आठ जण आठ दिवस खपून हे काम करत होते. यानंतर दोन तीन दिवसातच आलेला एक वनवा जाळ रेषेमुळे थोपवला गेला होता. सर्वांना हायसे वाटले पण ते आठवडाभरासाठीच. पुढच्याच आठवड्यात गावातल्याच कुणीतरी गैरसमजातून जाळ पट्ट्याच्या आतलं गवत पेटवलं न् वनवा लागलाच. सर्वांनी धावपळ करून दोन तासात तो विझवला. आता मात्र या विषयात काम करण्याचे सर्व गावानेच मनावर घेतले. सर्वांनी मिळून जाळ रेषा आखणे, आग न लावणे ही स्वयंशिस्त स्वतःला लावून घेण्याचा संकल्प केला. तेव्हापासून तर आतापर्यंत आता दरवर्षी नोव्हेंबर मध्येच जाळ रेषा मारली जाऊ लागली.

    गवताची मुळे पाणी माती, मुरूम यात खोल जातात अगदी पक्क्या मुरमातही ती वाढतात.  हळूवार पडणारा भीज पाऊस तर जमिनीत मुरतोच पण धो धो पडणारा पाऊसही गवतावरून जमिनीवर हळुवार पोहोचतो त्यामुळे व गवतांच्या मुळांमुळे तो जमिनीत अधिकाधिक मुरत जातो. गवताच्या मुळांमुळे मुरूम व मातीत भेगा निर्माण होतात आणि ह्या भेगांमधून पाणी आत जिरण्यास अधिक मदत होते. गवतांची मुळे वाळून कुजतात त्यावेळी तिथे बारीक पोकळ्या तयार होतात. त्या पोकळ्या ही पावसाचे पाणी जिरवण्यात मोठी भूमिका बजावतात. गवतामुळे माती घट्ट धरून ठेवली जाते, अगदी धोधो पावसातही मातीची धूप होऊन ती माती किंवा गाळ ओढ्यात येऊन साचण्याचे टळते. तसेच पाऊस मुरत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्यास बऱ्यापैकी अटकाव होतो.  गवताचा उपयोग फक्त भूजलासाठीच न करता  तर दूध धंदा व बकरी पालन साठी होऊन पैसे कमवण्याचा खात्रीशीर व्यवसाय सुद्धा होऊ शकतो. कोकणात योग्य नियोजन केल्यास व गवत विषयात अभ्यासू लक्ष दिल्यास हे नक्कीच शक्य आहे. गवतामुळे  पक्षी, कीटक, या आणि अशा प्राण्यांनाही गवत परिसंस्थेचा उपयोग होऊन जैवविविधतेला खूप मोठा आधार मिळतो. जैवविविधतेचा फायदा निसर्गातील इतर घटकांबरोबरच माणसालाही खूप मिळतोच.

 

       जाळ रेषा दरवर्षी नियमीत आखण्यामुळे वणवे लागणे पूर्ण बंद होवून आता झाडं व झाडावरची फळं होरपळत नव्हती. त्यामुळे दरवर्षी वेगाने ती डवरली जात होती. हळूहळू गवताबरोबरच मोठी झाडं डोंगरावर  वाढू लागली. झाडांना फळं लागू लागली. जंगल वाढल्यामुळे भेकरं, रानकोंबडे, ससे, खवले मांजर असे प्राणी पुढच्या पाच वर्षातच एकेक करून दिसायला लागले.  लोकांचाही त्यामुळे उत्साह वाढला. आता गवताबरोबरच झाडांची ही काळजी घेणे सुरू झाले. ( झाडे आणि भूजलाचा संबंध आपण मागिल एका लेखात सविस्तर पाहीलाच आहे. ) याचा एक मोठा फायदा असा झाला की पूर्वी खाजगी क्षेत्र शेतातल्या आंब्याच्या झाडावरील आंबे चोरीला जायचे. पण आता त्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली की चोरी होणे तर सोडाच पण पावसाळ्याच्या सुरवातीला झाडाचे काढून न घेता आलेल्या आंब्यांचा सडा पडतो.  एका वर्षी पाऊस खूपच जास्त पडला. डोंगराला भेगा पडल्या. मोठमोठ्या दरडी कोसळु लागल्या. पण या मोठ्या झाडांना त्या दरडी आडल्या. दरडी खाली येऊ शकल्या नाहीत .त्यामुळे जीवितहानी आणि घरं दोन्ही वाचली. तेव्हापासून तर झाडाचे महत्व खूपच अधोरेखित झाले. पूर्ण गावच आता गवत आणि झाडांची संवर्धन करण्यात  पुढे असतो. या सर्वांचा परिणाम काय झाला असेल ? गेल्या दहा वर्षात गावच्या भूजलाची पातळी जमिनीपासून  चक्क पंधरा फुटापर्यंत वाढत आली आहे. हेच भूजल आता डोंगराच्या कपारीतून ठिकठिकाणी दगडातून पाझर फुटून बाहेर वाहते आहे, अगदी एप्रिलमध्ये सुद्धा. भूजलाचा खूप मोठा साठा डोंगरामध्ये तयार झालाय. पण भिवघरच्या  अगदी लगतच्या कातिवडे गावात मात्र तीनशे फुटावरही पाणी लागलेलं नाही. कारण अजूनही दरवर्षी अनेकदा त्यांच्याकडे वनवे लागतच असतात. कोकणातील प्रत्येक गाव हे भिवघर होऊ शकतेच. जमिनीतले  पाणीच वाढते असे नाही तर गवताचा वापर करुन पशुपालन आणि  त्या तून गावांना पैशाचे ही झरे बारा महिने वाहतील. याबरोबरच जंगले व जंगली प्राणी ही वाचतील.

  किशोर पवार आणि त्यांच्या गावातील  मित्रमंडीळींनी

  आपले काम सूत्रबद्ध होणे साठी, आणि आपले हे काम इतर गावात पोहचावे यासाठी ‘वन प्रेमी सामाजिक संस्था’  ही रजिस्टर सेवाभावी संस्था सुरू केली आहे, कोकणातील इतर गावातील तरुणांनी त्यांचा आदर्श घेवून वणवा विरुद्ध ही चळवळ अधिक बळकट केली पाहिजे, त्यासाठी या संस्थेची मदत व मार्गदर्शन ते करत आहे. अनेकांनी त्याचा फायदा उठवला पाहीजे.

 

वनवे लागण्याची कारणे:

१.केवळ रस्त्याने जाता येता गवताचे कुसळ किंवा कुसळ गवताच्या बिया टोचतात म्हणून रस्त्याच्या बाजूचे पायवाटीच्या बाजूचे गवत लोक पेटवतात आणि वनवे लागतात. २.साप, विंचू, तसेच कोल्हे,तरस या सारखे जंगली प्राणी लपू शकतात आणि ते आपल्यावर हल्ला करतील व इजा करतील म्हणूनही गवत पेटवून देतात. ३ काही गवत जनावरे खातच नाहीत. अशा गवताचे क्षेत्र पुढच्या वर्षी वाढू नये म्हणून गुराखी अशा गवतांना आगी लावतात. त्यांचा समज की पेटवून दिल्याने ते गवतांचे बियांचे नष्ट होते. पण हे अर्ध सत्य आहे, बिया वाऱ्यांबरोबर इतरत्र पसरलेल्या असतातच.४. काही ठिकाणचे गवत जनावरांनी खाऊन टाकून बुडखं शिल्लक राहतात. हे बुडखं जाळून टाकली की दवाच्या थेंबा न ही हे गवत परत फुटतं आणि  जनावरांना चारा मिळतो या समजातूनही गवत जाळले जाते. ५.जाळ रेषा मारणे ही पद्धतच लोकांनी आणि वन खात्यानेही दुर्लक्षित केली आहे. लोकांनी स्वयंरक्षणासाठी व वन खात्याने जंगल जळू नये म्हणून दोघांचीही ही जबाबदारी आहे. वन खात्याची तर नैतिक व कायदेशीर दोन्ही बाजूने आहे. पण दुर्दैवाने ते वणवे विषयाबाबत फारच उदासीन आहेत, असे सार्वत्रीक अनुभव आहेत. उलट पक्षी वनखाते तर चक्क उन्हाळ्यात तपमान वाढीमुळे आग लागली असे छाती ठोकपणे सांगून मोकळे होतात. जाणकारांचे म्हणणे असे असते की मग खाजगी जमिनीत का नाही आग लागत ? झोपड्यांच्या पाचटाला कधीतरी आग लागायला पाहिजे ना. खरं तर   फांद्या एकमेकावर घासून अग्नी तयार होतो आणि आग लागते किंवा उन्हामुळे तापमान वाढून गवत पेटते या दोन्ही लोणकढी थापा आहेत. याचे सरळ कारण म्हणजे वाळलेले गवत जाळण्यासाठी २५०ते २७० डिग्री सेल्सिअस तर वृक्षाच्या फांद्या जळण्यासाठी ३०० ते ३५० डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते. उन्हामुळे गवताचे हे इतके तपमान वाढणे शक्य नाही. तसेच झाडांच्या फांद्याच्या घर्षणातूनही इतके तापमान शक्य नाही. थोडक्यात वणवे नैसर्गिक रित्या लागत नाहीत हेच खरे. अहमदनगर येथील अमित गायकवाड या निसर्गप्रेमीने त्याच्या जवळपासच्या गावांमध्ये लागणारे वनवे विझवण्यासाठी समविचारी मित्रांची एक मोठी टीम बनवली आहे. निसर्ग प्रेमापोटी ही मंडळी वनवे लागले की विझवण्यासाठी धावपळ करतात. केवळ यासाठी त्यांनी एक व्हाट्सअप ग्रुप ही बनवलाय. बाजूच्या ३०-४० किलोमीटर अंतरावरील गावातील वनवे  अनेकदा त्यांनी विझवले आहेत. त्यांची टीम त्यांना वाढवायची आहे, वनवे लागणाऱ्या गावातल्या लोकांचे प्रबोधन करून त्यांनाच या कामात सहभागी करून घ्यायचे आहे. वनवे विझवण्यासाठी लागणारे विविध साहित्य उदा. गम बूट, ग्लोव्ह्ज, ब्लोअर्स, त्यांना हवे आहेत. वनवे लागणाऱ्या जागा नोंदवून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना योजायच्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक गावात जाळ रेषा दरवर्षी आखायच्या आहेत. निसर्गप्रेमी संस्थांचे सहाय्य त्यांना मिळाले तर त्या कामाची व्याप्ती वाढेल असे अमित गायकवाड म्हणतात. लोकांनीच आपल्या गवताचे रक्षण करून गवताची परिसंस्था, वन्य प्राणी जीवन आणि स्वतःचा ही जीव सुरक्षित करून  समृद्ध जीवन जगावे  यासाठी अशा गावात गवत संवर्धनाच्या चळवळी उभ्या राहणे आवश्यक आहे.

   वनवा लागल्यावर १९६२ नंबर वन फोन करा असा प्रचार केला जातो. लोकांचा अनुभव फार वेगळाच आहे. हा नंबर बऱ्याचदा लागतच नाही ,लागला तर कोणी उचलत नाही आणि उचलून माहिती घेतली तरी कोणीही येत नाही. एका फोनला तर बारा दिवसानंतर खात्याने प्रतिसाद देऊन माणूस पाठवला होता, त्याची बातमी ही आली होती. कधी काळी फोन केल्यावर कोणी आलेच तर ते आग बघायला येतात, आग विझवण्याचे कोणतेही साहित्य त्यांच्याकडे दिसत नाही अशी सार्वत्रिक तक्रार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top