Satish Khade

झाडे, वाळू आणी भुजल

भुजला बाबत माती व खडक याबरोबरच आणखी काही घटक महत्त्वाची भूमिका बजावतात त्यातही झाडे आणि प्रवाहातली वाळू हे घटक अधिक महत्त्वाचे आहेत.

 

झाडे आणि भुजल

 

 जंगले असलेल्या प्रदेशांमध्ये तसेच इतरत्रही झाडे असलेल्या परिसरात भूजल जलसाठा चांगला असतो असे सार्वत्रिक निरीक्षण आहे.

 

नद्यांच्या उगमच्या ठिकाणी डोंगर आणि घनदाट जंगल असते. जंगलातुल झाडे व  त्यांची मुळे, यामुळे  डोंगराचा तो भाग स्पंज सारखा काम करतो. तिथे पडणारा जास्तीत जास्त पाऊस जमिनीत जिरतो. डोंगरातील  खडक पाण्याने गच्च भरतात  आणि झऱ्याच्या रूपात पाणी बाहेर पडू लागते. हे झरे मिळूनच नदीचा  उगम व  नदीचा प्रवाह सुरू होतो. हे झरे बर्‍याचदा बारमाही वाहत असत. पण    दुर्दैवाने अनेक नद्यांच्या उगमा जवळचे देखील जंगल वृक्षतोडीमुळे विरळ झाले आहे. त्यामुळे   आता लाखो वर्षे बारमाही वाहणारे झरे  आणि त्यांनी बनलेली नदी  उगमा नंतरच्या काही अंतरातच  पावसाळ्यानंतर दोन-तीन महिन्यातच कोरडे पडतात.

 

           वड, पिंपळ, उंबर, नांद्रूक, पिपरी या प्रजातीतील वृक्ष खूप मोठे वाढतात आणि दीर्घकाळ जगतात. अनुकूल जमिनीत त्यांची मुळे खूप खोलवर वाढतात. ती खालच्या कठीण खडकापर्यंत सलग व सहज वाढतात. या मुळांमुळेच जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात मुरते व भूजल वाढते. तसेच बाभूळ, खैर, शमी, शिरीष  या जातीच्या वृक्षांची ही मुळ सुद्धा खूप खूप  खोलपर्यंत वाढतात.हे भूजल वाढण्यासाठी अनुकूल आहेत. सार्वजनिक वृक्षारोपण कार्यक्रमात अशी झाड लावलीच पाहिजेत. तसेच गावोगावी माळरानावर ओढ्याकाठी, नदीकाठी वाढलेल्या बाभळीवर राग राग करू नये व त्यांची महत्त्व लक्षात घ्यावे असे सुचवावेसे वाटते. सर्वात खोल मुळं शमी वृक्षाची जातात (शंभर फुटापेक्षाही जास्त). वाळवंटात ही हे  वृक्ष  यामुळेच सदाहरित असतात. पाणी शोधेपर्यंत ही मुळे वाढतच राहतात. आपटा व कांचनाचे वृक्ष फार मोठे नसतात पण त्यांची मूळ खोलवर वाढतात. खडकातील बारीक-सारीक भेगांमध्ये फटीमध्ये ही मुळे शिरतात आणि तिथे वाढून जाड होताना त्या भेगा रुंदावतात. फटी मोठ्या होतात त्यात पाणी शिरते, साठते, परिणामी भूजल अधिक समृद्ध होते. चिंच ,आंबा, जांभूळ, बेहडा, मोई ,अर्जुन वावळ, कहांडळ अशा जातीच्या वृक्षांची मुळे खोलवर वाढतात, आडवी ,तिरपी वाढतात आणि भूजल वाढवण्यात मदत करतात. पाणलोट क्षेत्र विकास, नदी / ओढा पुनरुज्जीवन, वनीकरण, वृक्षारोपण उपक्रम करताना तसेच बांधावरही लावताना ही झाडे जरूर विचारात घ्यावी.

     वाळू आणि भूजल :

नदीतील वाळूचे महत्व

       नदी  सपाटीवरून वाहते तेव्हा तिच्या तळाशी वाळू असते. नदी पात्रात वाळूचे थरच्या थर असतात. ही वाळू नदी तळाची सछिद्रता कायम ठेवते व त्यामुळे जमिनीत खाली पाणी जिरण्याची प्रक्रिया उत्तम रीतीने घडते. वाळू नसेल तर नदीतील गाळामुळे  नदी तळ गच्च होऊन जाईल व पाणी मुरणे पूर्ण बंद होईल. याच वाळूत मासे व इतर जलचर ही अंडी घालतात. वाळूत साठलेल्या बायोमासवर बरेच छोटे जीव पोसले जातात. पात्रातील वाळूमुळे वेगाने आलेले पाणी  वाळूत मुरत जाते व त्यामुळे पाण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे पूराच्या वेळी नदीकाठ व तळ खरवडण्याचे होणारे नुकसान टळते. पाणी संथ झाल्या मुळे नदीतळाच्या खाली पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते. वाळूच्या कणाकणा भोवती पोकळी असते. त्यात पाणी साठवले जाते. या पोकळ्या जोडल्या जाऊन केशवाहिनी तयार होते व त्यातून पाणी भरण्याची प्रक्रिया घडते. केशवाहीन्यां मुळे भूजल वाढण्यास मदत होते. नदीपात्रात वाळू ऐवजी माती वा गाळ साठला असेल किंवा वाळू काढून घेतलेली असेल तर पाण्याबरोबर ही माती तळातल्या खडकांच्या भेगात जाऊन बसते आणि पाणी जिरणे बंद होते. भूजलाच्या वाढीसाठी जशी वाळू आवश्यक आहे तशीच पाण्यातील जीव आणि जैवविविधतेसाठी ही वाळू महत्त्वाचा घटक आहे. वाळूच्या  या पोकळीत साठलेल्या पाण्यात विविध बायोमास वाढते, अनेक मायक्रोब्ज वाळूला चिकटून राहतात. अनेक कीटकांचे आश्रयस्थान वाळूच्या कणांभोवती असते. अनेक मासे  व इतर जलचर वाळूत अंडी घालतात. प्रजननासाठी वाळू आवश्यक!! वाळू ऐवजी माती असेल तर माशांची अंडी मातीत रुततात. त्यामुळे पैदासही घटत जाते. वाळूत साठलेले पाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी कामाला येते. 

अनेक ठिकाणी नदीतली वा नाल्यातली ही वाळू तळापर्यंत खरवडून टाकली आहे. त्यामुळे पूर्वी नदीत पाणी नसले तरी जमिनीत पाणी मुरलेले व विहिरीत उन्हाळ्यातही असायचे, तिथे आता भूजल पातळी  खूपच खालावलेली आहे. कारण अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे नदीत वाळू नसल्याचे तोटे  आहे.

         यामुळे प्रत्येक गावाने ग्रामसभेत त्यांच्या गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्या व नदीतील वाळू काढण्यास संबंधितांना  लिलाव करण्याची परवानगी देऊ नये. कायद्यानुसार ग्रामसभेची मान्यता नसेल तर सरकारी यंत्रणा व महसूल विभाग वाळू लिलाव करू शकतच नाही. त्यामुळे आपले पाणी विशेषतः भूजल संवर्धनासाठी असे करणे आवश्यक आहे. नेवासा तालुक्यातील (जिल्हा अहमदनगर) येथील प्रवरा नदीकाठच्या चार-पाच गावांनी त्यांच्या हद्दीतील वाळू उचलण्याची मान्यता गेली ३०-४० वर्षे दिलेलीच नाही. अगदी अहमदनगर येथील मिलिटरी कॅंपसच्या बांधकामासाठी सुद्धा ती दिली नाही. त्यामुळे अवर्षणच्या वर्षामध्ये सुद्धा त्यांच्या गावातील भूजलावर मोठा परिणाम झाला नाही. लक्षात ठेवा ‘ग्रामसेवेची मान्यता’ हे खूप मोठे साधन वाळू वाचवण्यासाठी आपल्याकडे आहे त्याचा वापर करा.

      क्रश सॅंडचाच वापर करा

        काँक्रीट साठी व विशेषतः भिंतींना प्लास्टर साठी नदी नाल्यातील वाळूची मागणी असते. काँक्रीट मध्ये मोठी खडी, बारीक वाळू व सिमेंट यांचे मिश्रण असते. मोठ्या खडीच्या थरातील गॅप मध्ये बारीक वाळू बसते व वाळू आणि खडीच्या गॅप मध्ये सिमेंट बसते,  यातून दगड वजा पदार्थ  तयार होतो त्याला ‘ सिमेंट काँक्रीट’ म्हणतात, यात वाळू ऐवजी खडीचा भुगाही चालू शकतो, शेवटी त्याची भूमिका खडीतील गॅप भरण्याची !! त्यामुळे पूर्वीपासूनच ज्या प्रदेशात व देशात नद्या व वाळू नाही तिथे खडीचा भुगा म्हणजे ‘क्रश सॅंड’ वापरली जाते. आपल्याकडेही क्रशसॅंड वापरायला लागून २०-२५ वर्षे झाली आहेत पण अद्यापही अनेक लोक अगदी ‘इंजिनिअर’ लोकही वाळूच वापरण्याच्या अंधश्रद्धेत अडकले आहेत. त्यामुळे वाळू वाचवण्याच्यासाठी ‘क्रशसॅंड’ च्या पर्यायाविषयी सर्वांना सजग करणे अतिआवश्यक आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top