Satish Khade

भूजल वाढविण्यासाठी उपाय….

खडकातील वॉटरप्रूफ तळी

     मातीतील शेततळी त्याला प्लास्टिकच्या कागदाचे आच्छादन ही पद्धती आता सर्वत्र केली जात आहे, मात्र खडकातील व मुरुमातील अणकुचीदार दगडांमुळे अशा प्रकारची तळी होवू शकत नाहीत कारण तिथे प्लास्टीकचा कागदाचा उपयोग करता येत नाही व  या दगडातील भेगा वॉटरप्रूफ मटेरियल बुजव पण या दगडातील भेगा मुळे पाणी तळ्यात थांबू शकत नाही. पण याच भेगा स्वस्तातल्या वॉटरप्रूफ मटेरियलने बुजवता येतात. या मटेरियलची विश्वासार्हता व आयुष्यही दहा ते पंधरा वर्षापेक्षा अधिक असते. त्याची किंमतही प्लास्टिक कागदाच्या किमतीच्या आसपास पडते.  पुण्यातील एका रोटरी क्लब ने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या गावात  सात वर्षापूर्वी दोन मोठे तलाव  खडकात खोदले.  गावच्या लोकांना दोन दिवसांचे खास प्रशिक्षण देऊन खडकातील भेगा वॉटरप्रूफिंग मटेरियलने बुजून घेतल्या. त्या दोन तलावात साठत असलेल्या दोन कोटी लिटर पाण्यामुळे पिंगोरी गाव पिण्याच्याच नव्हे तर शेतीच्याही पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाले आहे. याच पद्धतीने रायगडच्या पायथ्याशी पाचाडच्या मासाहेब जिजाऊंच्या वाड्यातील हौदाची पाणी गळती ही थांबवली गेली आहे.  अशाच प्रकारचे मटेरीअल व कौशल्ये वापरुन   कोकणातील पागोळी विहिरीं ही वॉटरप्रूफिंग करून  वर्षभरासाठी पाणी साठवणे शक्य आहे.  मोठमोठ्या धरणांची पाणी गळती थांबवणारी कंपनी चालवणारे  एक  गृहस्थ अशा शेततळ्यांसाठी, पागोळी विहिरींसाठी तसेच वाड्या वस्त्यांवरील पिण्याच्या गळक्या टाक्यांसाठी वॉटरप्रुफिंग करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने मार्गदर्शन करत असतात.

 

      भूंगरु टेक्नीक( रिचार्ज शाफ्ट)

                                              भूंगरु म्हणजे बांबू.

 या तंत्रात जमिनीत खोलपर्यंत  बांबू रोवल्यासारखे बोअर होल करुन त्यात शेताशेजारचे वाहते वा साठलेले पाणी  गाळून सोडून खोलवरचा सछिद्र खडक पाण्याने भरुन टाकतात. यामुळे तो जलधर ( Aquifer) पाण्याने भरत जातौ, भूजल वाढते, अनेकांना त्याचा फायदा होतो. हवे तेव्हा तेच पाणी वापरता येते.  आता  दिवस पावसाळ्याचे आहेत. या दिवसात पावसाचे पाणी नद्यांमधून ओढ्यांमधून वाहू लागेल, तलाव ही भरतील व भरभरून ओसंडून वाहू लागतील. तेव्हा हेच पाणी जमिनीत गाळून सोडले तर लाखो करोडो  लिटर पाणी जमिनीत भरून घेणे शक्य आहे. यासाठी ओढ्यात वा नदीत बोरहोल घेऊन त्या बोरहोलच्या वरच्या तोंडावर थोडे बांधकाम करून त्यात दगड वाळूची गाळणी बनवून खूप पाणी जिरवता येईल. मराठवाड्यात व गुजरात मधिल कच्छ मध्ये बर्‍याच ठिकाणी अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात भूजल वाढवणे सुरु आहे. महाराष्ट्रात गावोगावी जमिनीवरचे पाणी अडवण्याचे व साठवण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे, होतही आहे. आता या पुढे जमिनीतील पाणी वाढवण्याची चळवळ वाढवणे खूप गरजेचे आहे. तलावातील व बंधाऱ्यातील, नदीतील पाण्याचा लगतच्या शेतकऱ्यांनाच त्याचा सर्व फायदा मिळतो पण त्याउलट जमिनीत जिरलेले पाणी दूर दूर पर्यंत अनेक शेतकऱ्यांना फायदा देते.

दगड वाळूच्या फिल्टरला पर्याय

   आता तर फिल्टर मीडिया म्हणून दगड वाळू रचणे,त्याला पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छ करणे या कटकटींच्या व जिकरीच्या कृतींना  फाटा देता येऊ शकतो असे तंत्रज्ञान व साधने उपलब्ध आहेत. त्यासाठी बाजारात बोअर वेल च्या पाईपलाच  उभे बसू शकणारे  फिल्टर उपलब्ध होत आहेत. ते सहजासहजी बसवता व काढता येतात. त्यामुळे फिल्टर मीडियाच्या उभारणीला व स्वच्छतेला  लागणा रे कष्ट व वेळ वाचतो. तसेच फिल्टर मेडीया साठी लागणारी जागा ही वाचते.  काहीशा वेळ खाऊ व श्रम लागणार्‍या पद्धतीला पर्याय मिळाला आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा फायदा सर्वांनी करून घ्यायला हवा. हे फिल्टर्स फडक्याने व ब्रशने सहज साफ करता येतात. ते बोरवेलच्या केसिंग पाईपला उभे बसवता येतात. अर्धा मीटर ते सात मीटर उंचीपर्यंत ते  उभारू शकतो. दहा ते पंधरा वर्षे त्यांचे आयुष्य असणार्‍या अशा उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि उच्च प्रकारचे धातू वापरून  हे फिल्टर बनवले आहेत.

 

 रिचार्ज वेल:

               विदर्भात काही ठिकाणी तर ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये ३०-३५  फुट खोल  विहिरी घेऊन रिचार्ज शाफ्टप्रमाणेच रिचार्ज वेल्सही ( विहीरी) घेण्यात  आलेल्या आहेत. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरून काही किलोमीटर   पर्यंत  भूजल वाढत जाते,  या विहिरीचांही दरवर्षी गाळ काढणे किंवा तिची स्वच्छता करणे  हे मात्र नियमितपणे केले जाते. आपल्याकडेही ओढे नाले व नदीला पाणी आल्यानंतर अशा पद्धतीने रिचार्ज विहिरींमधून आजूबाजूच्या परिसरामध्ये भूजल वाढवणे शक्य आहे.

 

    

 

नदीचे पाणी पंपाने उपसून बोअरवेल वा विहीरीत सोडणे :

 बहुतांश वेळा नदीचे वा तलावाचे पाणी शेत जमिनीच्या पातळी पेक्षा खालच्या पातळीवर असते, त्यामुळे शेतजमिनीतील  बोरवेल चे वरचे तोंडही  पाण्याच्या  पातळी पेक्षा वर असते. अशावेळी उताराने पाणी बोरवेल पर्यंत किंवा विहिरीपर्यंत आणणे अशक्य वा अवघड असते. अशावेळी अगदी पहिली सोपी पद्धत म्हणजे  पंप लावून पाणी बोरवेल पर्यंत आणून आणि ते गाळून बोरवेल मध्ये सोडता येते. ओढ्याच्या व नदीच्या वाहत्या पाण्याने विहिरीला पाणी वाढू शकते पण त्याच वेगाने ते बोरवेलला  वाढत नाही. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे धरण व बंधारे यामुळे नद्यांना पाणी अगदी मर्यादित दिवसांपुरतेच येत असते अशावेळी आपण ही संधी साधली पाहिजे.

  

     सायफन प्रक्रियेने पुर्नरभरण

        दुसरी एक सोपी पद्धत आपण वापरू शकतो. वाहत्या पाण्यात पाईपचे एक तोंड बुडवायचे आणि  दुसरे टोक बोअरच्या केसिंग पाईपला पाईपच्या व्यासाचे छिद्र पाडून त्याला जोडायचे. हा जोड एमसील व त्या प्रकारच्या मटेरियलने हवाबंद करायचा. ही जोडणी झाली की बोरवेल मधील पंप अगदी एका क्षणासाठी सुरू करून बंद करायचा. यामुळे बोर मधील हवा खेचली जाऊन तिथे पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्यासाठी आपण जोडलेल्या पाईप मधून पाणी खेचले जाते आणि अशा प्रकारे सायफन  प्रक्रियेने पाणी बोअररमध्ये ओढले  जाते.  मात्र या साठी ही खूप महत्वाचे म्हणजे वाहते पाणी मात्र गाळ विरहितच असायला हवे. गढूळ पाणी अजिबात सोडू नये. पर्याय नसेल तर ते फिल्टरने गाळूनच बोअरमध्ये सोडावे.

           आणखी एक सायपन पद्धतीच आहे. त्यासाठी फ्लॅप असलेला फुटबॉल वापरावा लागतो. पाईपच्या एका टोकाला फ्लॅप असलेला फुटवाल्व लावून तो बोरवेलमध्ये सोडायचा. सोडण्यापूर्वी त्याचे तोंड ( फ्लॅप) बंद करायची. ही फ्लॅप उघड बंद जमिनीवरूनच करण्यासाठी तीला तार जोडूनच पाईप बोरवेल मध्ये सोडायचा.पाईपचे दुसरे तोंड जलाशय व साठलेल्या पाण्यात बुडवायचे.ते बुडवण्यापूर्वी हा पूर्ण पाईप पाण्याने गच्च भरून घ्यायचा. पाणी भरून झाले की फुटवाॅल्व तारेला ढील देवून उघडायचा. पाईप मधून पाणी वाहने सुरू होऊन ते बोर मध्ये पडते. जलाशयातले पाणी पाईप मधून सायफन प्रक्रियेने वाहात येवून बोर पुनर्भरण होत राहते.

        सर्व प्रकारच्या पुनर्भरणात सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची म्हणजे कोणत्याही परिस्थितीत गढूळ पाणी युक्त पाणी विहीर व बोर मध्ये जाताच कामा नये.

 

 दगडाच्या खाणी पाण्याने भरणे

        गेली काही वर्षे सरकारी बांधकामांसाठी विशेषतः रोड व विविध प्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी चाललेल्या बांधकामांसाठी , तसेच खाजगी बांधकामासाठी लागणारे दगड खाणीतून मोठ्या प्रमाणात काढण्यात आला आहे. अशा खाणींमध्ये पुराचे, शेतातले जादाचे पाणी सोडून त्यांचा वापर जलसाठ्यासाठी होऊ शकेल. जिथे जिथे अशी अनुकूल परिस्थिती असेल तिथे हा उपक्रम जरूर यशस्वी होण्यासारखा आहे.

      वरील सर्व  उपाय गावाने, समूहाने, वाडी वस्तींनी, फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांनी, पाणी वापर संस्थांनी  तर करायचा आहेच पण वैयक्तिक पातळीवर या उपाय योजनांचा अधिक लाभ घेणे शक्य आहे. पाणी शेतीसाठी प्रमुख कच्चामाल आहे आणि तो निसर्गातूनच मोफत मिळत असल्याने त्यासाठी फक्त वाहतुकीचा खर्च ( तो ही नगण्य) करून तो आपल्या जमिनीतल्या खडक रुपी गोडाऊनमध्ये जास्तीत जास्त साठवणूक करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top