यावर्षीही पावसाचे आगमन लांबले आणि यंदा पाऊस कमी असणार आहे या हवामान खात्याच्या अंदाजाला पुष्टी मिळतेय की काय असे वाटतेय. लोक पावसाळा आणि त्याबरोबरच पुढचं वर्ष पाण्याच्या बाबतीत कठीण जाणार आहे हे गृहीत धरून चिंतेत आहेत हे खरं. आशा करूया की यंदा ही पाऊस गरजे इतका पडेल.
पण लोकांची चिंता व्यर्थ नाहीये कारण पाऊस आणि पाणी सर्वांच्या जीवनावर विविध अंगाने प्रभाव पडणारा विषय आहे. पाऊस हा फक्त शेतकऱ्याच्याच जीवनाशी निगडित नसून प्रत्येकाचेच जीवन, आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, संस्कृती आणि सामाजिक शांतता या सर्व सामाजिक विषयांवर गंभीर परिणाम करणारा असतो.
पाऊस आणि जीवसृष्टी:
मुळात जीवसृष्टी निर्माण झाली आणि लाखो वर्षे जगते आहे ती पाण्यामुळेच. पण पाऊसच नाही तर जमिनीत न् जमिनीवर पाणी नसणार किंवा असणार ते अपुरे पाणी. त्यामुळे मोठ्या झाडांच्या वा पिकांच्या मुळांना पाणी नाही, पीक आणि झाडे त्यामुळे मृत्यू पंथाला लागतात. जनावरांचे प्रचंड हाल होतात. जंगलातले प्राणी हे तहाने ने व्याकूळ होत प्राण सोडतात. पाळीव प्राण्यांना थोडाफार माणसांचा आधार मिळतो कारण ते उत्पन्न देतात म्हणून. पण उत्पन्न न देणाऱ्या पाळीव प्राण्यांचे ही मरण ओढवतेच.
माणसांच्या जीवनात वेगळे काय असणार पाणी नसल्याने नापिकी आणि त्यातून खाण्यापिण्याचे हाल, अनारोग्य, कुपोषण इ. सर्वच. आर्थिक उत्पन्नाची गोष्ट तर खूप दूर. त्यातूनच घडते मोठे स्थलांतर.
स्थलांतर
जगाची परिस्थिती सध्या राहू द्या पण भारतातलं चित्र बघितलं तर भारतातली अस्ताव्यस्त न् अवाढव्य वाढणारी शहरं ही स्थलांतराची प्रचिती देतात. अगदी तालुका पातळीवरची ही गाव आणि नगरं स्थलांतरितांनी भरत आहेत. कोविड काळात घरी परतणाऱ्या लोकांचे लोंढेच्या लोंढे देशभरात सर्वत्र नजरेस पडत होते त्यावरूनही अंदाज यावा.
खरंतर स्थलांतर म्हणजे एक प्रकारे जिवंतपणे मरण असल्यासारखेच असते. घरातील जिवलग विखुरतात, कुटुंब मोडते, गावाच्या गावं ओस पडतात. कष्टाची काम न करू शकणारी वयस्कर घरी बसतात, त्यांचे वर्णन तर नकोच. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने होणाऱ्या स्थलांतरापेक्षा गावात पाणी नसल्यामुळे होणारे स्थलांतर कित्येक पट अधिक आहे. UNESCO च्या अहवालात म्हटले आहे की जगभरात पाण्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वर्षागणीक वाढतेच आहे आणि २०५० पर्यंत जगभरात अडीचशे कोटी लोक पाण्यासाठी स्थलांतर करतील. आपल्याकडेही कोकणात २५०० मि.मी. पाऊस पडतो तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी ६०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो पण दोन्ही भागातून स्थलांतर मोठ्या प्रमाणात होते. संबंध पाऊस किती येतो त्यापेक्षा उपलब्ध पाण्याचे नियोजन चुकते आहे हेच खरे. स्थलांतरातून अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न यापूर्वीही निर्माण झालेत. इथून पुढे तर या समस्यांची व्याप्ती आणि तीव्रता दोन्हीही खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हे सांगायला शास्त्रज्ञाची गरज नाही.
आरोग्य
नीती आयोगाच्या २०१८ च्या अहवालानुसार भारतातील ६० कोटी लोकांना दूषित पाणी प्यावे लागते. तसेच भारतात उपलब्ध गोड्या पाण्यापैकी (नदी, तलाव, भूजल) ७० टक्के पाणी प्रदूषित आहे. पाणी गुणवत्तेबाबत भारताचा १२२ देशांच्या यादीत १२० वा क्रमांक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ८० टक्के आजार पाणी व सांडपाण्या मुळे होतात. यात डायरिया, कावीळ, टायफाईड या आजाराबरोबरच अनेक त्वचारोग व श्वसनाचे रोग अयोग्य पाण्यामुळे होतात. तसेच रासायनिक खतांचे, कीटकनाशकांचे आणि तण नाशकांचे अवशेष पाण्यात मिसळून कॅन्सर, किडनीचे विकार, श्वसन यंत्रणेचे, मेंदूचे विकार अशा आजारांनी ग्रासलेल्या ग्रामीण व शहरी लोकसंख्येची मोठी भर पडते आहे. घरगुती सांडपाणी, मैलायुक्त पाणी यांचे मोजमाप आणि नियंत्रण हे खूप मोठे आव्हान आपल्या देशात सर्वत्रच आहे. अशावेळी पावसामुळे येणार्या नविन पाण्याची आवक या सर्वाचीच तिव्रता कमी करण्यास मदत होते.
शिक्षण
पाउस नसल्यावर पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे स्थलांतर आणि त्यामुळे शिक्षणाची फरपट हे सार्वत्रिक चित्र आहे. तसेच पाणी नसल्याने नापीकी आणि दारिद्र्य याचा विपरीत परीणाम शिक्षणावर होतोच होतो.सरकारी धोरणं न् मदत यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बर्या पैकी लोकसंख्येपर्यंत पोहचते पण त्यानंतरच्या शिक्षणाची अवस्था खूपच गंभिर आहे. पाणी भरायला घरी कोणी नाही म्हणून तसेच शाळेत टाॅयलेट नसल्यामुळे किंवा असले तरी तिथे पाणी नसल्यामुळे शाळेतील मुलींची व मुलांची ही गळती लक्षणीय आहे.
अर्थकारण
भारतात आजही ६२% लोकांचे उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे आणि शेती पाण्यावर. पाऊस झाला नाही तर शेतात काही पिकू शकत नाही त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांची खरेदी क्षमता शून्य होते. त्यामुळे गावात वस्तूंची विक्री होवू शकत नाही. विक्री नाही तर वस्तूंची निर्मिती आणि सर्व प्रकारच्या इतर व्यवसायावर त्यामुळे विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वैयक्तिक पातळीपासून गाव पातळीवर, राज्य व देश यांच्याही अर्थकारणाला याचा फटका बसतो. भारत देश मोठाअसल्याने कुठल्या ना कुठल्या चार ते सात राज्यात दरवर्षी दुष्काळ असतोच. याचे जीडीपी पासून ते बँक व्यवसायापर्यंत सर्वांना गंभीर परिणाम सोसावे लागतात. थोडक्यात पाऊस व पाणी नसेल तर सर्वांचेच अर्थकारण बिघडते.
तसेच अयोग्य व दूषित पाणी प्यायल्यामुळे आजारी होणारी लोकसंख्या ६० कोटी पेक्षा अधिक आहे. या आजारपणामुळे कमकुवत झालेले शरीर, आजारपणात असताना वाया जाणारे मनुष्यतास, तसेच औषधं, दवाखाना,इस्पीतळांचा खर्च यातून होणारे वैयक्तिक ते राष्ट्रीय आर्थिक नुकसान खूप मोठे आहे. मेडिकल कॉलेजेस, हॉस्पिटल्स, आरोग्य विमा व औषधांचे कारखाने यापेक्षा पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व सांडपाण्यावर प्रक्रिया व त्याची योग्य विल्हेवाट हा आरोग्याकडे नेणारा महामार्ग आहे पण लक्षात कोण घेतो ?
समाजस्वास्थ व शांतता
नापिकी तून स्थलांतर आणि यामुळे कुटुंबं, समाजसमुह, गावं हे सगळेच उध्वस्त होत जातात . हाताला काम नाही, अर्धपोटी जगणं आणि जीवनाच्या आकांक्षांना मूठमाती मिळणे यामुळे पूर्ण समाज मनच निराश व हतबल असतं. बऱ्याचदा यातून असंतोष निर्माण होऊन त्याचे परिणाम मोर्चे काढणे, दंगली, चोऱ्या,गुन्हेगारी वाढणे यात होताना दिसतात. यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही समाजमनावर ताण येतो. शहरात स्थलांतरीत होवूनही ह्या लोकांना बकाल आयुष्यच वाट्याला येते. तसेच स्थलांतरामुळे शहरांवरही सगळा बोजा पडतो. शहरातील सर्व पायाभूत सोयी आणि सुविधांवर प्रचंड ताण येतो. याचे विपरीत परिणाम समाज स्वास्थ्यावर होत राहतात.
संस्कृती
संस्कृती विकास आणि समृद्धी रिकाम्यापोटी होऊ शकत नाही. उलट अशा अवस्थेत तिची विन अधिक ढिली होऊन ती विस्कळत जाते. स्थलांतरामुळे समूहाच्या समूह एकमेकापासून दूर जातात त्यामुळे साधे नेहमीचे सणवार साजरे करता येत नाहीत. आनंद,दुःख वा महत्वाचे क्षण आप्तांच्या समवेत घालवण्याच्या चालीरीती ही पाळणे शक्य होत नाही, हळूहळू पुढच्या पिढीला तर ते माहिती होत नाहीत. त्यामुळे वैयक्तिक व सामाजिक पातळीवर ही कला, साहीत्य,शास्त्र परंपरा यांत नवनिर्मिती तर थांबतेच पण असलेली लोककला,लोकसाहित्य लोप पावत जाते.
वरीलपैकी एकही व्याख्येत बसू न शकणारी आणखी एक सामाजिक समस्या म्हणजे दुष्काळी व जिरायती गावातील लग्नाच्या मुलांना मुलीं न मिळणे. मुळात शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाच्या मुली न मिळणे आधिच अवघड झालेले असताना पाणी नसलेल्या व कायम दुष्काळ असणाऱ्या गावातील मुलांना कोणीही मुलगी देण्यास तयार होत नाहीत. हा सार्वत्रिक चिंतेचा विषय आहेच.
इतके सगळे परिणाम होत असतानाही आम्ही आमच्या पातळीवर पाणी विषय गंभीरतेने घेतोय का ? यापेक्षा आम्ही स्थलांतर करणे पसंत करतो. इतर सामाजिक समस्यांना सामोरे जातो, कधी हरणे पत्करुन मरणाला सामोरे जातो, पण गाव पातळीवर, गट पातळीवर, वैयक्तिक पातळीवर पाण्यावर काम करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. पाणी! माती, पिके यांच्या विषयी अधिकाधिक अभ्यास व अनुभव घेऊन उत्तम पाणी नियोजन आपण नक्की करु शकतो. त्याव्दारे पाणी समस्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या सामाजिक समस्यांना खरंतर आटोक्यात ठेवू शकतो. आपण आपल्या निश्चयाच्या बळावर , एकमेकांचे सहकार्य घेत आणि सरकारी योजनांचा व मदतीचा मदत घेऊन आपण आपले गाव जल स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प करायलाच हवा. त्यासाठी आपण पुढील सप्तपदी सर्वच जण चालू या,.. पाणी साठवणे, पाणी वाचवणे, पाणी प्रदूषित न होवू देणे, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर, पाणी गळती व पाणी चोरी रोखणे, शुद्ध पाणीपुरवठा आणि जलज्ञानी समाजाची निर्मिती !!
चला जलस्वयंपूर्ण गावचा संकल्प करून तो सिद्धीस नेण्यासाठी आजपासूनच सज्ज होवू या !!