Satish Khade

एल निनो ,ढगफुटी,हवामान बदल आणि मान्सून….

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे भारताच्या मान्सूनवर अनेक घटकांचा प्रवाह आहे आणि आधुनिक साधनांमुळे अनेक निरीक्षणे समोर येऊन त्या घटकांमध्ये वर्षागणिक भरच पडत  आहे. पण ‘एल निनो’ घटक सतत चर्चेत असतो म्हणून हा लेख प्रपंच ….

 

पावसाचा संबंध ढगांशी आणि वाऱ्यांशी ! वाऱ्याचा संबंध हवेच्या तापमानाशी. हवेची वेगवान हालचाल म्हणजे वारे. हवेच्या दाबात फरक होतो तेव्हा ही हालचाल होते.  पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वतःभोवती फिरताना पृथ्वीचा वेगवेगळ्या भागावर सूर्याची किरणे वेगळ्या पद्धतीने ( सरळ वा तिरपी)  पडतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात तपमान वेगवेगळे असते. उदा. सूर्य जेव्हा उत्तर गोलार्धात असतो तेव्हा तिथे तापमान जास्त आणि दक्षिण गोलार्धात कमी असते व तो दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा तिथे जास्त आणि उत्तर गोलार्धात थंडी. तसेच  जमीन आणि समुद्राचे पाणी यांच्या तापमानातही फरक असतो. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते तर पाणी उशिरा तापते आणि उशिरा थंड होते. याचा परिणाम हवेवर होतो. हवा गरम झाली की तिची घनता कमी होते आणि ती वर वर जाते, त्यावेळी त्या हवेची जागा बाजूने येणारी थंड हवा घेते, यातून वाऱ्याची निर्मिती होते. जमिनीचे तापमान सामान्यतः सूर्यकिरणांशी संबंधित असते पण समुद्राच्या पाण्याच्या तपमानावर  मात्र अनेक घटक प्रभाव टाकतात, कारण समुद्रात अनेक वेगवेगळे प्रवाह सुरू असतात. समुद्रात अनेक कारणांमुळे अनेक प्रकारे अनेक दिशांना प्रवाह सुरू असतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची तापमान सगळीकडे सारखे नसते. कोण कोणते असतात हे प्रवाह ?   पृथ्वीचे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरण्याने समुद्रात तयार होणारे प्रवाह, समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या ताकदीमुळे तयार होणारे समुद्राचे प्रवाह ,सूर्य चंद्र व पृथ्वी यांच्यातल्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे तयार होणारे प्रवाह! जमीन आणि समुद्र यांच्या सीमांच्या असलेल्या आकारामुळे तयार होणारे प्रवाह, सूर्याचे उत्तर व दक्षिण गोलार्धात असल्यामुळे बदलणाऱ्या तापमानामुळे तयार होणारे प्रवाह, तसेच समुद्राच्या पाण्याच्या वेगवेगळ्या क्षारतेमुळे तयार होणारे प्रवाह .या सर्व प्रवाहांमुळे हजारो किलोमीटरच्या समुद्रात पाण्याचे अनेक प्रवाह वाहत असतात. त्यामुळेच समुद्राच्या पाण्याचे तापमान पूर्ण समुद्र भर कधीही सारखे नसते. समुद्राच्या  दोन टोकांमध्ये तापमानाचा फरक पडल्याने जमिमीप्रमाणेच समुद्रावरही हवेच्या दाबात फरक होतो. त्यातून समुद्रावर वाऱ्यांची निर्मिती होते. या वार्‍याव्दारे बाष्प आणि ढग वाऱ्याच्या दिशेने नेले जातात. आता जेव्हा पॅसिफिक महासागराचा  ( प्रशांत महासागर) पूर्वेकडील भागाच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. त्या परिस्थितीला एल निनो  असे म्हणतात. तर हेच तापमान जेव्हा सरासरीपेक्षा कमी असते तेव्हा त्याला ला निनो असे म्हटले जाते. या दोन्ही अवस्थांचा जगभरातल्या वाऱ्यांच्या दिशेवर त्यामुळे  हवामानावर व पावसावर खूप प्रभाव पडतो. भारतीय मान्सूनवर ही  एल निनोचा  विपरीत परिणाम होऊ शकतो हा आजवरचा तरी अनुभव आहे. तसेच गेली तीन वर्षे ‘ला निना’ परिस्थिती कायम राहिल्याने भारताला मान्सून समाधानकारक राहिला, हे हवामान शास्त्रज्ञांचे अनुमान आहे.

 एल निनो स्थिती दर दोन ते सात वर्षात कधीही घडते, त्याला काहीही नियमतता नाही. तसेच ही अवस्था नऊ महिने ते दोन वर्षे टिकते. जेव्हा ती  सात ते नऊ महिन्यासाठी होते तेव्हा त्याला  ‘एल निनो स्थिती’ आणि यापेक्षा याचा कालावधी अधिक असतो त्याला ‘एल निनो एपिसोड’ असं म्हटले जाते. एल निनो स्थिती गेल्या शतकभरात तीस वेळा घडली आहे. या एल निनोचा  जीवसृष्टीवर ही खूप प्रभाव पडलेला आहे.  गेल्या काही हजार वर्षांचे पुरावे (जीवाश्म व तत्सम पुरावे ) याची पुष्टी करतात. तसेच जगातील ठिकठिकाणच्या मानव समुहांचा इतिहास, विविध मानवी संस्कृती यांचा उदयस्त चा  संदर्भ ही एल निनो शी  लागला आहे. मध्ययुगीन व अलीकडच्या इतिहासातील प्रमुख घटना त्यांचा कालखंड यांचा संदर्भ एल निनोच्या वर्षांशी  जुळतो आहे. एल निनोच्या अभ्यासावर गेली काही दशके जगातील बहुतांशी हवामान शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्र केले असते तरी याविषयीचे पहिले निरीक्षण व नोंद इसवी सन १५०० ला झाली, तर एल निनो ह्या शब्दाचा उल्लेख १८९२ मध्ये पहिल्यांदा झाला.

 

‘इंडीयन ओशन डायपोल’

 प्रशांत महासागरातील वरील  दोन्ही परिस्थितीप्रमाणेच हिंदी महासागरातील तपमान बदलाचाही भारतीय मान्सूनवर प्रभाव आहेच. हिंदी महासागराच्या सीमाही दक्षिण अंटार्टिका ला जाऊन भिडतात.तसेच  पश्चिमेकडे आफ्रिका खंड तर पूर्वेला इंडोनेशिया आहे त्यामुळे या सागराच्या तापमानात ही असमानता आहे. अलीकडच्या अभ्यासातून हेही निरीक्षण नोंदवले गेले आहे की हिंदी महासागराच्या पश्चिमेकडचा भाग जेव्हा त्याच्या पूर्वेकडच्या भागापेक्षा अधिक उष्ण असतो तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस चांगला पडतो, पण कधी कधी याच्या उलट परिस्थिती असते तेव्हा मॉन्सूनची विपरीत अवस्था असते. ही परिस्थिती आलटून पालटून येत असते, यालाच ‘इंडियन ओशन डायपोल’ असे म्हणतात. या अवस्थेच्या संबंधावर आधारित हवामानाचे मॉन्सूनचे पूर्वानुमान काढले जाते.

 

हवामान बदल आणि मान्सून

   पावसाचा सगळा खेळ हा जमीन व समुद्र यांच्यातील तापमान फरकावर आहे. हजारो ,लाखो वर्ष या तापमानावर प्रभाव होता सूर्याचा पण औद्योगिक क्रांतीनंतर आणि त्यातही गेल्या पन्नासाठ वर्षात हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन आणि इतर वायू यांच्यात औद्योगीकरण आणि  वाहनांमुळे वेगाने पडत असलेली भर यामुळे हवेच्या तापमानातला मोठा बदल घडत आहे.  त्यातूनच जगभरात ठिकठिकाणच्या  हवेच्या दाबात होणारा फरक मोठ्या प्रमाणात  अनियमित झाला आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा भरकटल्या आहेत आणि यातूनच मान्सूनची अनिश्चितता वाढलेली आहे. इथून पुढे ती वाढतच जाणार आहे.

 

 

ढगफुटी

       क्लाउडबर्स्ट वा ढगफुटी हे पावसाचे एक टोकाचे रूप आहे.  क्लाउडबर्स्टची घटना पृथ्वीपासून अंदाजे १५ किमी उंचीवर घडते. खरं तर, ‘ढगफुटी’ मुसळधार पावसासाठी एक वापरला जाणारा शब्द आहे. ही तांत्रिक संज्ञा नाही, लोकांनी केलेली संज्ञा  आहे.एखादा पाण्याने भरलेला फुगा फुटला, तर एकाच ठिकाणी पाणी खूप वेगात पडते, अगदी तसेच परिस्थिती ढगफुटीच्या घटनेत दिसून येते. पण म्हणून ढग फुग्यासारखे किंवा मोठे पाणी भरलेले पोते  नसतात, त्यामुळे ते फुटले आणि अतिवृष्टी झाली असे म्हणता येत नाही. या नैसर्गिक घटनेला ‘क्लाउडबर्स्ट’ किंवा ‘फ्लॅश फ्लड’ असेही म्हणतात.

 

पर्वतांवर पाउस जास्त पडतो कारण जेव्हा पाण्याने भरलेले ढग वाऱ्यासह फिरतात तेव्हा ते पर्वताच्या दरम्यान अडकतात. पर्वतांची उंची त्यांना पुढे जाऊ देत नाही. डोंगरांच्या दरम्यान अडकताच ढग पाण्यात रूपांतरित होऊन पाऊस पडू लागतो. ढगांमधील थेंबांची घनता व वजन हवेला झेपण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने  पाऊस सुरू होतो.

ढगफुटी म्हणजे १५ते२० चौ. कि.मी. परिसरात ताशी १००मि.मी इतका वा त्याहून अधिक पाऊस असतो त्याला ढगफुटी किंवा क्लाऊडबर्ट्स म्हणतात. ही पावसाळ्यातच व विशेषतः डोंगराळ भागात होणारी घटना आहे. हल्ली काही वेळा मैदानी प्रदेशातही ढगफुटी झाल्याचे आढळले आहे, परंतु बऱ्याचदा अशा ठिकाणी  पावसाचे निश्चित मोजमाप करण्याची सोय  नसल्याने ठाम विधाने करता येत नाहीत. ढगांचा पसारा काही किलोमीटर असतो, तसेच उंचीही काही किलोमीटर असते. काही वेळा ढग डोंगराला आदळून कोसळण्याआधी त्यांचा एक उभा ढग तयार होतो त्याला उभा स्तंभ असे हवामान शास्त्रज्ञ म्हणतात. हा उभा स्तंभ तयार होताना बाष्पाचे थेंब वेगाने वर जातात. जाताना अनेक थेंब एकत्र होत होत मोठे होत जातात. या मोठ्या थेंबांनी युक्त उभा ढगातील थेंब वजनामुळे वेगाने जमिनीकडे झेपावतात.मग  सगळा ढग खूप मर्यादित जागेत आणि मर्यादित वेळेतच रिकामा होतो. हेच ‘क्लाऊड बर्स्ट वा ढगफुटी. सपाटी प्रदेशात हेच काम डोंगराएवजी गरम हवेचा झोत करतो. जमिनीलगत तापलेल्या हवेचा स्तंभ तयार होतो ,तो ढगात घुसतो आणि बाष्प आणि थेंबांना एकत्र करीत वेगाने वर आकाशाकडे घेऊन जातो. तेच मोठे झालेले थेंब यांचा भार हवेला तोलेनासा झाला की ते जमिनीवर कोसळतात. काही काही घटनांमध्ये दोन व अधिक मोठे ढग एकत्र होऊन स्तंभ निर्मिती होऊन ढगफुटी होते.

जुलै २००५ मध्ये  मायानगरी मुंबईत सुमारे ९५० मि.मी. पावसाची नोंद झाली. मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शहरावर मोठे आस्मानी संकट ओढवले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top