जलपर्णी हे महावरदान
जलपर्णी महावरदान हे शीर्षक धक्कादायक वाटले तरी काही निरीक्षणे, काही संशोधनाचा मागोवा व काहीसा अभ्यास केल्यानंतरच या अनपेक्षित अनुमानावर आलो आहे. दोन वर्षांपूर्वी मंचर (जिल्हा पुणे )येथील दूषित सांडपाणी घेऊन वाहणारा नाला निसर्गाच्या मदतीने( Phyto remedial पध्दतीने ) चांगल्या पाण्याचा करता येईल का यासाठी चार साडेचार किलोमीटर नाला फिरून पाहिला. नाल्यात पाणी वाहत पुढे जाताना दुर्गंधी व करड्या रंगाचे कधी तर काळ्या रंगाचे. पुढे त्यावर असलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी तुंबलेले होते. पहिल्या बंधाऱ्याच्या अडलेल्या पाण्यात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात होता आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या पुढच्या बंधार्याच्या नंतरचे पाणी एकदम नितळ दिसत होते. या दोन्ही बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस (up stream side) पूर्ण नाल्यात दोन्ही थडी ला लागेपर्यंत जलपर्णी पसरलेली होती. दुसऱ्या बंधाऱ्याच्या जो कॉलेज च्या थोडे पुढे आहे, भिंतीवरून पडणाऱ्या नितळ पाण्याने मला सुखद धक्का दिला .मी बरोबर असलेल्या तज्ञ सायली जोशी यांना याबद्दल विचारले तर त्यांनी हे पाणी बऱ्यापैकी प्रदूषण मुक्त असते असा निर्वाळा दिला आणि त्याचे कारण आहे ही पसरलेली जलपर्णी !! दुसरे निरीक्षण नारायणगाव च्या मीना नदीच्या पाण्यात टिकली गवत वाढलेले. बाजूला म्हणजे नारायणगावच्या पश्चिमेला जाऊ तसंा ते टिकली गवत कमी होत गेले व एका टप्प्यानंतर अजिबात नाहीसे झालेले. यातून कुतूहल जागे झाले आणि माहिती घेणे सुरू झालं .दरम्यान एक पोस्ट ही वाचण्यात आली, विदर्भातील एका तालुक्याच्या गावी जलपर्णी पासून धागे काढतात आणि त्याच्या लोक उपयोगी वस्तू बनवतात. मग तर या विषयाचा पिच्छा पुरवायचाच असं मनाने घेतलं.
‘अहो जलपर्णी ही निसर्गाचीच योजना आहे, जिथे जिथे पाण्यात सेंद्रीय घटक जमा होतात तिथे जलपर्णी अवतीर्ण होते. शुद्ध वाहत्या पाण्यात, धरणाच्या पाण्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची जलपर्णी दिसणार नाही.’ पहिला पाठ गिरवला सायली जोशी यांच्याकडे. आपले सांडपाणी मुख्यतः तयार होते मानवी मलमूत्रा मुळे. त्याचबरोबर साबण, डिटर्जंट यामुळेही पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम मोठ्या प्रमाणात वाढते. ह्या अशा सेंद्रिय घटकांवर तर जलपर्णी पोसली जाते.
तसंच पुढे हे ही कळालं की जिवित नदीच्या शैलजा देशपांडे काही संशोधक व विद्यार्थी यांना बरोबर घेऊन जलपर्णीवर काम करताहेत. ‘बायोअॅक्युमुलेशन’ म्हणजे पाण्यातील प्रदूषण करणारे घटक जलपर्णी किती किती साठवते आणि त्याचे चांगले-वाईट परिणाम हा विषय दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांनी हाती घेतलेला पण करोनाच्या या कालावधीत काम ठप्प झाले. त्यांची प्रतिक्रिया ‘खूपच विषारी पदार्थ ही जलपर्णी शोषून घेत असावी, कारण प्रयोगासाठी नदीतून काढताना वा प्रयोगशाळेत त्यावर काम करणार करताना जलपर्णीची बऱ्याचदा एलर्जी आली .हाताना ऍसिड लागल्यासारखे आग होणे, खाजव येणे वगैरे .हॅन्ड ग्लोज घालून काम करतात तरी त्रास होतो.” ‘आमचा अभ्यास निरीक्षणे प्रयोग सुरू आहेत पण त्यावर निष्कर्ष देण्यासाठी अजून पाच सहा महिने लागतील’.
दरम्यान पुण्यातलेच डॉ. समीर शास्त्री हे सांडपाण्यावर बरेच संशोधन व प्रकल्प करतात. त्यांच्या M.E.च्या व पीएचडी च्या विद्यार्थ्यांकडून सुद्धा बहुदा सांडपाण्यावर संशोधन व प्रयोग करून ते घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांडपाण्याच्या इतर अनेक यशस्वी प्रयोगातच, ‘जलपर्णीचा सांडपाणी शुद्धीकरणातील भूमिका’ यावरही संशोधन त्यांच्या विद्यार्थिनी प्राध्यापक भारती महाजन यांनी केले आहे ते समजले आणि मग त्या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यांचं संशोधन त्यांनी पवना नदीच्या एका टप्प्या साठी केले. त्यांनी वेगवेगळ्या शक्यता वापरल्यावर अनुमाने काढली. त्यांच्या अनुमानानुसार जलपर्णी सांडपाणी शुद्ध करते. पाण्यातील विरघळलेले व न विरघळलेले घनपदार्थ शोषून घेते. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी पाच ते सात युनिट इतकी वाढते.यावर पुढे सविस्तर लिहीले आहे. तर प्रा. भारती महाजन यांच्या संशोधनाने सिद्ध केले आहे की सांडपाणी जलपर्णीमुळे शुद्ध होते, स्वच्छ होते.
जलपर्णी म्हणजे पाण्यात वाढणारी वनस्पती. तिच्या चाळीस-पन्नास विविध प्रजाती आहेत. आपल्याला पुण्याच्या नद्यात निदर्शनास पडणारी जलपर्णी ही सर्व ठिकाणी आढळते. या प्रजातीची एक हेक्टर पाण्याच्या पृष्ठभागावर २० लाख झाडे असतात. हे सर्व पाण्याच्या बाहेर काढून वजन केले तर ते २७० ते ४०० टन म्हणजे एकरी २०० टन भरते. हे अतिशय वेगाने वाढणारे बायोमास आहे. हे बायोमास दर पाच दिवसाला दुप्पट होते. ९५टक्के पाणी असलेल्या या वनस्पतीत प्रथिनांची मात्र विपुलता असते. निळी फुले येणारी टम्म फुगलेली पाने बल्ब सारखा दिसणारा देठ व खोलवर गेलेली मूळं. ही सर्वसाधारणपणे आढळणारी जलपर्णी.
ही जलपर्णी पाण्यातून काढून टाकण्याचा आग्रह असल्याची ही कारणं ही सबळ आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जलपर्णीचे जाळे सांडपाण्याच्या पृष्ठभागा बरोबरच खाली खोलवर पोहोचलेले असते. ते घनदाट म्हणावे असे असते. यातून प्रवाहाला खूप गतिरोध होतो व सांडपाणी खूप हळू पुढे सरकते. यामुळे पाऊस झाल्यावर किंवा इतर कारणांनी या ओढ्याला वा नदीला पाणी आले की त्या घनदाट जलपर्णीमुळे ते अडते आणि पूरपरिस्थिती निर्माण होण्याची काहीशी शक्यता असते. जलपर्णीमुळे सांडपाणी झाकले जाते त्यामुळे हवेतला ऑक्सिजन त्यात मिसळणे अवघड होऊन बसते. तसेच सूर्यप्रकाशाला ही अटकाव होतो, त्यामुळे खाली पाण्यात अनोरोबीक विघटन सुरू होते. त्यामुळे खरंतर दुर्गंधी येते. तसेच यात आक्सिजन कमी असल्याने कोणताही जीव किंवा मासे तग धरणे अवघड किंवा अशक्य. त्यामुळे अन्नसाखळी तुटलेली असते. मासे नसल्यामुळे मासेमारी जमातीची उपासमार होते. मासे डासांची अंडी व अळ्या खातात पण माशांना ऑक्सिजन नसल्याने ते जलपर्णी च्या आसपास जाऊ शकत नाहीत, डासांची पैदास त्यामुळे वाढत राहते. त्याला नैसर्गिक अटकाव होत नाही. छोट्या-मोठ्या बोटींची वाहतूक ठप्प होते. याच दरम्यान
साधारणपणे चार पद्धतीने जलपर्णी काढून टाकता येते किंवा कमी करता येते. १) मनुष्यबळ वापरून २) मशिनरी वापरून ३) तन नाशक यासारखी रसायने वापरून ४) कीटक जलपर्णीवर सोडून. पण यापैकी प्रत्येक पद्धतीला काहीना काही मर्यादा आहेत. मनुष्यबळ व मशीनला खोल पात्र ,रुंद पात्र याच्यामध्ये मर्यादा येतात. तसेच ते खूप खर्चिक ठरते. माणसाच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. मशिनरी पात्रात आत जाऊ शकत नाहीत, खोली असलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तणनाशक फवारून क्लोरोफिल चा नाश करून जलपर्णी सुकवणे व त्यातून ती नष्ट करणे हा तसा सोपा उपाय असला तरी अशा तणनाशक रसायणामुळे अशुध्द सांडपाणी विषारी होते. त्याचबरोबर पुढे नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावर च्या वनस्पती इतर जीवसृष्टीला ही यामुळे खूप मोठा धोका पोहोचतो. यामुळेच हा उपाय तर खूपच धोकादायक व दीर्घ पल्ल्यासाठी विनाशक आहे. कीटकांमार्फत जलपर्णी काढून टाकण्यावर तर खूपच मर्यादा आहेत.
अनेक अभ्यासकांचा आणि पर्यावरणवाद्यांचा ही जलपर्णीच्या अस्तित्वाला विरोध असतो तो विविध मुद्द्यांवर ! त्यात महत्त्वाचा मुद्दा असतो सूर्यकिरण पोहोचत नसल्याने व विघटनामुळे जलपर्णी असलेल्या ठिकाणी खाली पाण्यात जैवविविधता धोक्यात असते. हा त्यांचा दावा मला मोठा विरोधाभास वाटतो कारण तसेही सांडपाण्यात बीओडी ,सीओडी खूप जास्त असते ,विरघळलेला आॅक्सिजन अगदीच नगण्य असतोअशा स्थितीतही जलपर्णी नसली तरी जैवविविधता कशी काय अस्तित्वात राहू शकेल ?
जलपर्णीच्या मुळाची पावडर, प्रक्रिया केलेली पावडर, त्यापासून तयार केलेला ऍक्टिव्हेटेड कार्बन या सर्वांचा प्रभावी ‘बायोअब्साॅर्बंट’ म्हणून वापर होतो. हा अॅक्टीव्हेटेड कार्बन बॅगमध्ये भरून खान कामांमुळे दूषित झालेल्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरला जातो. ही झाली पर्यावरण दृष्टीने जलपर्णीची उपयुक्तता !! याला योग्य व्यावसायिक नियोजनाची जोड दिली तर जलपर्णीची शेती ही पर्यावरणीय व आर्थिक दृष्ट्या अति उपयुक्त ठरू शकेल.
प्रत्यक्ष व्यावहारिक व व्यावसायिक पातळीवर ही याची उपयुक्तता आहेच. बहुविध उपयोगी जलपर्णी अमूल्य देणगी ठरावी अशीच आहे.
जलपर्णीत प्रथिनांचा समुच्चय असल्याने खत व खाद्य म्हणून उपयोग होतोच आहे. बऱ्याच ठिकाणी औषधी उपयोग तर काही ठिकाणी त्याचे तंतू व धागे काढून विविध गृहोपयोगी वस्तू ही बनवल्या जातात . खतासाठी उपयोग : जलपर्णी शेणात मिसळून त्यावर जिवाणूंचे विरजण (बॅक्टेरिया कल्चर )एकत्रित करून उत्तम खत तयार करतात नुसत्या जलपर्णीचे ही कंपोस्ट खत केले जाते. जलपर्णी गांडुळांसाठी उत्तम खाद्य आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात गांडूळ खत भारतात अनेक ठिकाणी तयार केले जाते. इतकेच काय वाढलेली जलपर्णी अर्थात फक्त मैला पाण्यावर वाढलेली शेतात मल्चिंग करून वापरली तरी भेंडीचे उत्पन्न ६८% बटाट्याचे उत्पन्न १४ टक्के तर टोमॅटोचे ९० टक्क्यांनी उत्पन्न वाढते. राख ,माती ,भाजीपाल्याचा किंवा सेंद्रिय कचरा व जलपर्णी असे एकत्र करून कुजवून खत करण्याच्या पद्धती ही प्रचलित आहेत.
खाद्य म्हणून उपयोग: डकविड आणि त्यासारख्या काही जलपर्णी या उत्तम पशुखाद्य आहेत. वराहासाठी जलपर्णी उकडून त्यात भाजीपाल्याचा कचरा, भाताचे तूस असे एकत्र करून उत्तम पोषण मूल्य असलेले खाद्य बनवतात. जलपर्णी व मळी यांच्या मिश्रणाने उत्तम पशुखाद्य बनते. काही विशिष्ट बुरशीचा वापर करून जलपर्णीचे सर्व अवशेष आंबवली जातात. त्यातून पचनास उत्तम असा प्रोटीन युक्त आहार दुभत्या जनावरांना देण्यात येतो. कॅटफिशच्या वाढीसाठी जलपर्णीची पावडर उत्तम खाद्य आहे.
जलपर्णी चे औषधी उपयोग: जलपरर्णी ची पावडर गाॅयटर आजारावर उपयुक्त आहे. तसेच ताजी जलपर्णी, गोमूत्र, मीठ व मिरी यांचे मिश्रण ही गाॅयटर साठी वापरतात. जलपर्णीचा ताजा रस जखमा भरून येण्यासाठी वापरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही जलपर्णीत बीटा कॅरोटीन सारखे व इतरही अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट ,विटामिन ई, विटामिन सी मोठ्या प्रमाणावर मिळते.
माध्यम म्हणून उपयोग :आॅस्टर नावाची बुरशी वाढवण्यासाठी सुकवलेली जलपर्णी महत्त्वाचे व उपयुक्त साधन आणि माध्यम आहे. या सर्व उपयुक्ततेवर कडी करणारी एक उपयुक्तता खूप महत्त्वाची आहे. हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिरीकरण करणारे रायझोबियम बॅक्टेरीया यांच्या पैदाशीसाठी जलपर्णी बायोमास सर्वोत्तम भूमिका बजावते. यासाठी ही जलपर्णी ला मोठी मागणी आहे. भविष्यात तर ती खूपच वाढत राहणार आहे. जलपर्णीच्या देठापासून चांगल्या दर्जाचे तंतू मिळतात. त्या तंतूंच्या धाग्यासारखे वापर करून दोरी, बास्केट व तत्सम वस्तू बनवतात. तशा प्रकारचे उद्योग अगदी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा या तालुक्यात आमदार सुभाषभाउ धोटे यांनी पुढाकार घेऊन बचत गटाच्या माध्यमातून दोन अडीच हजार महिलांसाठी कुटीरोद्योग ही सुरू केला आहे. भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स येथे धाग्यांच्या अधिक अधिक वापर होतो. त्यातून पार्टिशन, फर्निचर यासाठीही वापर शक्य होतो. ग्रीस प्रुफ पेपर बनवण्यासाठी जलपर्णी चा वापर केला जातो. ही माहिती जगभरातला व भारतातला घरातही संदर्भ घेऊन लिहिली आहे. यात पुण्यातल्या संशोधनाचा संदर्भही आपल्याला यावर शिक्कामोर्तब करणार आहे. पुण्यातील प्राध्यापक भारती महाजन यांनी डॉक्टर समीर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली निरीक्षणे व संशोधन केले. त्यांनी नदीतल्या प्रवाहातच जलपर्णीच्या दोन तीन प्रजाती वापरून ते सांडपाणी काही प्रमाणात शुद्ध करता येईल का किंवा ते शुद्ध होते का हे तपासले. त्यासाठी त्यांनी पवना नदीच्या किवळे पासून ते दापोडी पर्यंत मुळा संगमापर्यंत नदीचा भाग अभ्यासला. या अंतरात नदीला पावसाळ्यात ३३ ओढे-नाले येऊन मिळतात, उन्हाळ्यात त्यांची संख्या १९ असते. हे नाले २९२ एमएलडी सांडपाणी म्हणजेच दर दिवशी२९ कोटी २० लाख लिटर सांडपाणी पवना नदीत आणून सोडतात. या पाण्यावर प्रत्येक ओढ्यातच त्याच्या पात्रात जलपर्णी वाढवली व त्याच्या साह्याने सांडपाण्यातील बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांड ,( सेंद्रिय घटकांचे विघटन करण्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी) व सीओडी (असेंद्रिय घटकांचे विघटन करण्यासाठी लागणारी आॅक्सिजन ची मागणी) तसेच पाण्यात विरघळणारा ऑक्सिजन यांचे मोजमाप करणे हा मार्ग शुद्धीकरणाची पातळी मोजण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत विविध प्रारूपे उभे केली. तीन पैकी पहिले प्रारूप होते जलपर्णी विरहित पाण्याचे विशिष्ट पद्धतीने वहन घडवून आणणे, दुसऱ्यात त्यांनी मोठ्या ट्रेमध्ये सांडपाण्याच्या ९० टक्के पृष्ठभागावर जलपर्णी पसरवली आणि तिसऱ्या प्रारूपात पाण्याच्या ५० टक्के पृष्ठभागावर जलपर्णी पसरवली. त्याचे सलग पाच दिवस निरीक्षण करण्यात आले. सर्वच प्रारूपात त्यांनी रोज एक एकदा असे पाच दिवस सलग मोजमापे(readings) केली. हाच प्रयोग त्यांनी जलपर्णीच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती वापरूनही केले. यासाठी वॉटर लेट्युस व डकवीड या दोन प्रजाती वापरल्या. या पाच दिवसात ट्रे मधील सांडपाण्यातील डीओ, बीओडी, सीओडी तसेच न विरघळलेल्या घटकांचे प्रमाण, विरघळलेल्या घटकाचे प्रमाण, नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम यांचे प्रमाण त्यांनी मोजले. त्याची तुलनात्मक मांडणी केली व त्यावर निष्कर्ष काढले. यात सगळ्यात चांगले सकारात्मक परिणाम ५०% पृष्ठभागावर पसरवलेल्या प्रारूपाला मिळाला. तिसऱ्या दिवशीच मोठा फरक जाणवला होता पण पाचव्या दिवशी तर खूप मोठा परिणाम दिसला. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर ही असेच विविध प्रयोग सुरू ठेवले. यातून त्यांचे निष्कर्ष हेच आहे की जलपर्णी मुळे सांडपाणी शुद्ध होण्यास मदत होते. पण पाण्याचा पृष्ठभाग जलपर्णी ने व्यापण्याला मर्यादा असावी, म्हणजे मर्यादित स्वरूपात वाढू दिली तर जलपर्णी सांडपाणी शुद्ध करण्याचे काम करतेच करते.
वरील विवेचनावरून हे लक्षात यावे ही जलपर्णी सरसकट काढून टाकण्यापेक्षा मर्यादित स्वरूपात काढून टाकत राहावे. पर्यावरणीय व व्यावहारिक उपयोग तिचा करून घ्यावा त्यासाठी व्यवसायिक मॉडेल उभे राहावे. ते फार अवघड ही नाही. मोठमोठ्या खर्चाचे, मोठ्या प्रमाणात उर्जा लागणारे, विविध रसायनांचा वापर करून परत रसायनयुक्त पाणी सांडपाणी बाहेर सोडणारे एस.टी.पी किंवा ई.टी.पी. उभारण्याऐवजी या वैज्ञानिक !नैसर्गिक, निर्धोक सत्याचा स्वीकार करून जलपर्णीचे नियोजन करून पूर्णपणे मोफत सांडपाणी शुद्ध करून घ्यावे. यासाठी वनस्पती शास्त्र ,पर्यावरण शास्त्र प्राणिशास्त्र ,पाण्यातले अभ्यासक, या विषयातल्या अभ्यासकांनी पुढे घेऊन त्याचे समर्थनही करायला हवे. शास्त्रीय माहितीचा प्रसार करीत प्रशासनाला यासाठी प्रवृत्त करावे.
राहतो प्रश्न डासांचा व दुर्गंधीचा ! सांडपाणी विषयातले तज्ञ डॉ. अजित गोखले यांनी यावर उपाय सांगितला, पाण्यात पंपाच्या साह्याने दर दिवशी मर्यादित वेळेसाठी हवेचा झोत सोडला तर पाण्यातला आक्सिजन वाढेल. त्यामुळे जलपर्णीच्या खाली ही मासे येतील. येथे वाढतील आणि ते मासे डासांच्या अंड्या डासांची अंडी व अळ्या खातील. त्यातून डासांवर नियंत्रण येईल, तसेच या ऑक्सिजन मुळे अनरोबीक विघटन ऐवजी अरोबीक विघटन होईल व त्यातून दुर्गंधीचा नाश होईल. अर्थात यासाठी खर्च अगदीच नगण्य असेल. याचबरोबर या पाण्यात युट्रीक्युलारीया या नावाची पाणवनस्पती वाढवली तर डासांचा उपद्रव थांबेल. कारण या वनस्पतीच्या पाण्यातील पानांवर बारीक पिशव्या असतात. डासांच्या अतिसूक्ष्म अळ्यांना या पिशव्या फस्त करतात. त्यामुळे डासांचा उपद्रव या उपायानेही थांबवता येईल.
जलपर्णी बद्दल शास्त्रीय दृष्टिकोन वापरून तिच्याविषयीच्या आजवर वाळलेल्या अंधश्रद्धा म्हणजे ती शत्रूच आहे, तीला दूर करून निसर्ग संवर्धनासाठी विशेष हा पाण्याचे प्रदूषण दूर करण्यासाठी उपाय अंमलबजावणीसाठी जनजागरण करूयात !!
सतीश खाडे,
पुणे
9823030218