Satish Khade

मोहा तालुका परळी जिल्हा बीड…..

शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजलाचे संवर्धन करणारे गाव :मोहा तालुका परळी जिल्हा बीड…..

 

        धरणाच्या पाण्याचे वाटप, छोट्या छोट्या धरणांच्या व त्यांच्या कॅनॉलच्या पाण्याचे वाटप व नियोजन करणाऱ्या पाणी वापर संस्था, अगदी मोजक्या का होईना पण शेतीला मीटरने पाणी देणार्‍या शेतकर्‍यांचे गाव यासर्वाबद्दल आपल्याला माहिती असते पण महाराष्ट्रात अशीही काही गावं आहेत की जी भूजलाचा ही शास्त्रशुद्ध अभ्यास करतात त्या भूजलाचा ताळेबंद मांडतात आणि त्याचे नियोजन करून समृद्धी मिळतात, अशा काही गावांपैकी एक आहे बीड जिल्ह्यातील ‘मोहा’ गाव. बालाघाटच्या डोंगररांगात पूर्व पश्चिम दक्षिण तिन्ही बाजूंनी बेडलेले ६००० लोकसंख्येचे गाव. गावाचे एकूण क्षेत्र १९७० हेक्टर आणि ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून. गावचं वार्षीक पर्जन्यमान ५८१मि.मी. गावाला एक नदी वळसा घालून जाते.७० च्या दशकांपूर्वी  हजारो झाडं असलेल्या अमरायांनी व्यापलेले  हे गाव. ७२ च्या दुष्काळात गावतळे तयार झाले. पाणी आले नि व्हायचे तेच झाले. खटाखट आमराया तुटल्या आणि ऊस उभा राहत गेला. सिंचनाखाली क्षेत्र वाढले  न् सिंचनाचे प्रमाण ही कितीतरी वाढले. पर्जन्यमान कमी  व अनियमित  होत जाणं आणि  लोकसंख्या वाढ अशा काही गोष्टींमुळे गावात लवकरच पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले.  पुढे पुढे ते वाढतच गेले. ते इतके की लोकांना पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍याला ही गाव महाग झाला. या पार्श्वभूमीवर २०१० च्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड कुमार शिराळकरांनी गावातल्या युवकांच्या चर्चेत उजाड डोंगर, पाऊस, माती, पाणी यासंबंधी काही शास्त्रीय माहिती दिली. यातून गावातील  ३०-४० युवक परिवर्तनीय नजरेतून ‘पाणी दुर्भिक्ष’ या विषयाकडे पाहू लागले. हे युवक काही करू इच्छितात हे याची खात्री झाल्यावर पुण्यातील एम.के.सी.एल. कंपनीच्या टीमने गावाला भेट देत माहिती घेत पुढील वाटचालीसाठी युवकांना मार्गदर्शन केले. पाणी विशेषतः भूजल संवर्धनाच्या प्रशिक्षणासाठी युवकांना खरपुडी (जि. जालना) च्या कृषी विज्ञान केंद्रात पाठवले आणि त्याचवेळी गावाला एक पर्जन्यमापक ही भेट दिले. तेव्हापासूनच गावात पाऊस मोजणे सुरू झाले. २०१२ ला खरपुडीत ॲक्वाडॅम संस्थेच्या तज्ञांनी या युवकांना प्रशिक्षण दिले. त्यात पाणलोट क्षेत्रात करायची कामे, जमिनीखालील खडकांची रचना व त्यांचे भूजला शी संबंध, पाणी मुरणे, अपधाव ( Runoff) मोजणे, गावचे टोपोशिट म्हणजेच गाव नकाशा कसा वाचायचा, त्याचा पाणलोट क्षेत्र विकास व भूजल संबंधी कसा उपयोग करून घ्यायचा आणि सर्व कामांची शास्त्रशुद्धता कशी राखायची हे शिकवले.  गावात जाऊन या युवकांनी पुढे काय काम करायचे आहेत हेही सांगितलं. त्यानुसार प्रशिक्षण घेऊन आलेल्या युवकांनी  लगेचच गावातील विहिरी आणि बोरवेलचा सर्वे सुरू केला. या सर्वेत सर्वात प्रथम गाव परिसरातील सर्व विहिरींची जी.पी.एस. म्हणजेच गुगल मॅप वर त्यांची ठिकाणं नोंदवली. त्यांना क्रमांक दिले. प्रत्येक विहिरीचा व्यास, खोली, तिच्यातील पाण्याची खोली, महत्त्वाचे म्हणजे जमिनीच्या खाली माती ,मुरमाची उंची, खडकाची उंची, खडकाचा प्रकार बदलला तर प्रत्येक प्रकारच्या खडकाची उंची, अशा सर्व नोंदी केल्या.  त्यांनी मे महिन्यातील विहीरींची पाणी पातळी मोजली. पुढे  पूर्ण वर्षभराचा पाऊस मोजायला सुरुवात झाली. दर रविवारी  निवडक ४१ विहिरींची पाणी पातळी मोजणे सुरू होते, जवळजवळ सलग ७५ रविवारी  !! या ४१ विहिरींची निवड एक्वाडामने काही निकषकांवर केली होती. पुढे  काही दिवसातच ॲक्वाडॅम ची ही एक टीम घेऊन काही माहिती घेऊन गेली. त्यांनी विहिरींच्या पंपिंग टेस्टही केल्या, म्हणजे पाच मिनिट, दहा मिनिट, एक तासात पंप चालू केल्यावर पाणी पातळी किती खाली गेली, परत तीच मूळ पातळी येण्यासाठी किती वेळ लागला हे तपासले. त्यावरून खडकातल्या पाण्याची गणितं केली. विहिरीतील खडकांच्या थरांच्या समुद्रसपाटीपासूनची उंची मोजली. यावरून थराच्या जाडीची कल्पना आली. याच बरोबर त्यांनी GSDA ( ‘भूजल विभाग महाराष्ट्र शासन’ नी बनवलेले खडकांचे, जलधरांचे नकाशे युवकांना समजावून सांगितले. तसेच या नकाशावरूनच पाणी पुनर्भरण क्षेत्र( रिचार्ज झोन) आणि डिस्चार्ज झोन हे कुठे कुठे आहे हे हीदाखवून दिले. तसेच जमिनीखालचा पाणी धरून ठेवणारा खडक म्हणजेच जलधराच्या सीमा दाखवून दिल्या. त्याला ॲक्वीफर मॅपिंग  असेही म्हणतात. ही सर्व माहिती हा युवकांचा गट चांगलीच आत्मसात करत होता. या गटातल्या युवकांची संख्याही हळूहळू वाढत होती.   माहिती मिळाल्यामुळे या युवकांचा आत्मविश्वास ,कामाची दिशा आणि ऊर्जा हे सर्वच  मिळाले होते. यानंतरही  विशाल देशमुख व सुदाम शिंदे या युवकांनी ॲक्वाडॅम चे पंधरा दिवसाचे पुढचे  ॲडव्हान्स प्रशिक्षणात भाग घेऊन गावातील पाण्यासंबंधी  पुढची कार्यवाही आणि दिशा काय असावी हे जाणून घेतले. या प्रशिक्षणात खडकशास्त्र, भूजल शास्त्र, जलधर सीमांकन हे तर होतेच पण पाण्याचे नियोजन शिकवण्यात आले., तसेच उपलब्ध पाण्याच्या आधारित पीक पद्धतीची निवड  आणि भूजल नियोजनावर अशाच प्रकारे काम करणाऱ्या गावांच्या यशोगाथा ही दाखवण्यात आल्या. तुमच्या गावाबरोबरच लगतच्या गावांचा होणारा फायदा या आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश प्रशिक्षणात होता.

 

       दरम्यान गावातील जलसंधारणाच्या कामाची प्रगती नियोजनाच्या टप्प्यावर सुरू होतीच. पाणलोट विकासाच्या कामासाठी निवडक मंडळी श्रमदान करायची पण गावात इतरांकडून प्रतिसाद बराच कमी होता.  निधी नसल्यामुळे काय काम करायचं माहित असूनही हात बांधल्यासारखेच होते. सरकार दरबारी ही प्रस्ताव देऊन सादरीकरण करूनही मोठमोठ्या आश्वासनांशिवाय काहीही मिळाले नाही. पण उमेद, इच्छा शक्ती कायमच टिकून होती. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही मंडळीं काॅ.अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेजोगाईच्या मानव लोकसंस्थेच्या अनिकेत भैया लोहिया यांना भेटून मदतीची मागणी केली. त्यांनीही अतिशय उदार मनाने आणि काही अटीवर एक खोदाई मशीन या गावासाठी पाठवले आणि गावचे पुढचे चित्र बदलले. या खोदाई मशिनच्या मदतीने तळ्यातला गाळ काढायचा, तो ट्रॅक्टर ने शेतात टाकायचा याचे पहिले नियोजन झाले. डिझेलचा व ट्रॅक्टरचा खर्च गाळ टाकून घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केला. त्याच निमित्ताने ज्या शेतकऱ्यांनी शेताची बांधबंधिस्ती केली आहे त्यांनाच हा गाळ मिळेल ही अट असल्याने मोठ्या प्रमाणात शेतांची बांधबंदिस्ती झाली. ४० हेक्टर तलावातला गाळ अडीच महिन्यात दोनशे एकरात  ४२०००  ट्रिप गाळ पसरवला गेला. वरील अटीमुळे ९११एकराची बांध बंदिस्ती ही झाली.

         आता सर्व गावचाच उत्साह वाढला आणि पुढच्या वर्षी आमिर खानच्या वॉटर कप मध्ये गावाने भाग घेतला. त्यावेळी ही श्रमदानातून २१हजार घनमीटर आणि मशीनने तीन लाख घनमीटर माती काम करून जलसंधरणाची विविध कामे केली. मुख्य म्हणजे ह्या सर्व कामांच्या जागांची निवड खडकांच्या नकाशांच्या माहितीच्या आधारावरच केली. गावात एक हजार पेक्षा अधिक शोष खड्डेही केले. कंपोस्ट खड्डे ९८२ केले. रोपवाटिका केली ,त्यात ११००० झाड तयार केली. गावात ठिकठिकाणी लावली खरी, पण दुर्दैवाने झाडांचे संगोपन जमले नाही आणि त्यातली नंतर फक्त २००च झाड जगली हेही तितकेच खरे. पण यंदा परत  पन्नास हेक्टर मध्ये वृक्षारोपणाचे नियोजन हे लोक करत आहेत. या सर्वांमुळे ५८१ मि.मी. सरासरी पाऊस असूनही भूजलाचा साठा या गावात चांगलाच वाढला. तसेच  गाळामुळे शेताची उत्पादकता तीन पट झाली. हे इथेच थांबलं नाही, हा तर अर्धाच भाग होता नियोजनाचा. आता उपलब्ध भूजलाचे नियोजन त्याहून महत्त्वाचे होते. साठवलेले हे पाणी स्प्रिंकलर व ड्रीपने च शेताला देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या या गावात मोठी असून ७५ टक्के पेक्षा अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. या गावात उसासारखे जास्त पाणी लागणारी पिक घेण्याची प्रमाण नगण्य झाले आहे. याच ऊस शेतकऱ्यांनी आता कांद्याच्या बीजाचे उत्पादन सुरू केले आहे. बारा महिन्यानंतर उसाचे जेवढे पैसे होतात त्यापेक्षा अधिक या कांदा बिजाच्या व्यवसायातून चार महिन्यातच मिळतात, असा त्यांचा अनुभव. त्यातून महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी वाचते ही मोठी जमेची बाजू .मिश्र प्रक्रिया आंतरपिके हेही पर्याय पाणी नियोजन साठी वापरले जातात.

 

        सर्व गावातल्या लोकांचा सहभाग पुढे मिळवला याचे रहस्य काय असावे ? २००९ पासून या गावात माजी खासदार कै.काॅम्रेड गंगाधर आप्पा  बुरांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एक ऑक्टोबरला एक व्याख्यान असते. ह्या व्याख्यानात पाणी, शेती, विकास या विषयात काम उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन असते. यातून समाजमन हळूहळू घडत गेले. तसेच तरुणांचा हा गट गावात कायमच आरोग्य ,शिक्षण आणि रोजगारासाठी उपक्रम राबवत होता अगदी निस्वार्थपणे ! यामुळेच गावाने त्यांच्या पाण्याचे उपक्रमाला हळूहळू साथ दिली आणि पूर्ण गाव एक होऊन प्रतिसाद दिला आणि यातून हे गाव जलसंपन्न तर झालेच पण त्यांनी महाराष्ट्र पुढे एक चांगला आदर्श उभा केला. इतकच काय त्यांनी यंदा  गेल्या महिन्यातच सात दिवसांचा कीर्तन महोत्सव ठेवला होता. . विशेष म्हणजे या महोत्सवामध्ये जे प्रवचनकार, कीर्तनकार येऊन बोलले. त्यांच्यासाठी विषय दिलेला होता ‘संत तुकारामांनी शेतकऱ्यांना त्यांच्या गाथेतून शेतकऱ्यांविषयी जे मार्गदर्शन केले आहे किंवा लिहून ठेवलेले आहे त्याचे निरूपण !!     किती प्रगतिशील विचार आहे ना  ?असे कीर्तन महोत्सव किंवा असे पाणी सप्ताह सर्व गावांमध्ये सुरू झाले तर पाणी नियोजन, संपन्नता आणि समृद्धी का दूर राहील शेतकर्‍यापासून, गावापासून !!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top